ज्येष्ठ समीक्षक आणि संशोधक डॉ. सुरेश चुनेकर यांचे पुण्यात निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:45 AM2019-04-01T11:45:19+5:302019-04-01T16:35:58+5:30
' सहा साहित्यकार', ' अंतरंग', जयवंत दळवी यांची नाटके: प्रवृत्तीशोध' या पुस्तकांव्यतिरिक्त जी. ए कुलकर्णी यांच्या ' सोनपावले' या कथासंग्रहांचे संपादनही त्यांनी केले.
पुणे: ज्येष्ठ समीक्षक आणि संशोधक डॉ. सुरेश रामचंद्र चुनेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. डॉ. चुनेकर यांचा जन्म २७ एप्रिल १९३६ रोजी पुण्यात झाला. साताऱ्यात शिक्षण घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी एमएची पदवी आणि पीएचडी मिळविली. पीचडीनंतर त्यांनी संशोधन कार्याला सुरुवात केली. १९९६ मध्ये पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले. मराठी संशोधन पत्रिकेचे संपादन करण्याबरोबरच त्यांनी बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या कवितांची सूची, तसेच त्यांच्या समग्र वाङ्मयाची संदर्भ सूची तयार करण्याचे काम केले.चुनेकरांचा माधवराव पटवर्धन : वाड्मय दर्शन' हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ मानला जातो. साहित्य अकादमीसाठी त्यांनी ' माधव ज्युलियन' हा ग्रंथही लिहिला. ' सहा साहित्यकार', ' अंतरंग', जयवंत दळवी यांची नाटके: प्रवृत्तीशोध' या पुस्तकांव्यतिरिक्त जी. ए कुलकर्णी यांच्या ' सोनपावले' या कथासंग्रहांचे संपादनही त्यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास या खंड ५ आणि ६ मध्ये मराठी समीक्षेचा इतिहास याचे लेखनही त्यांनी केले. साक्षेपी संपादन आणि संशोधनाविषयी एकाग्रतेने आणि शिस्तीने केलेले लेखन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्य होती.