ज्येष्ठ स्त्रीवादी  लेखिका, स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या डॉ. विद्युत भागवत यांचे निधन

By श्रीकिशन काळे | Published: July 11, 2024 09:42 PM2024-07-11T21:42:03+5:302024-07-11T21:43:28+5:30

प्रसिध्द लेखक व फास्टर फेणे फेम भा. रा. भागवत यांची त्या सून होत्या

Senior Feminist Writer Dr Vidyut Bhagwat passed away in Pune | ज्येष्ठ स्त्रीवादी  लेखिका, स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या डॉ. विद्युत भागवत यांचे निधन

ज्येष्ठ स्त्रीवादी  लेखिका, स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या डॉ. विद्युत भागवत यांचे निधन

श्रीकिशन काळे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या डॉ. प्रा. विद्यूत भागवत यांचे गुरूवारी (दि.११) निधन झाले. त्यांनी जवळपास तीन दशके स्त्री चळवळीत काम केले. त्यांनी अनेक लेख आणि काही पुस्तकेही लिहिली आहेत. त्यांच्या मागे एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

प्रसिध्द लेखक व फास्टर फेणे फेम भा. रा. भागवत यांची त्या सून होत. त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला अध्ययन केंद्राच्या संस्थापक संचालिका होत्या. २००८ मध्ये त्या निवृत्त झाल्या. हे भारतातील स्त्रीविषयक अभ्यास केंद्रांपैकी अग्रणी केंद्र समजले जाते. विद्युत भागवत या स्त्रीवादी अभ्यासक, लेखिका आणि कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जात होत्या. गेली ३० वर्षे महाराष्ट्रातील महिला, विद्यार्थी, दलित आणि शेतकर्‍यांच्या चळवळींशी त्या संबंधित होत्या. महिलांविषयक अभ्यासाला स्वतंत्र अभ्यास शाखा म्हणून घडविणाऱ्या विचारवंतांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. त्यांचे स्त्रियांच्या प्रश्नांवरील लिखाण, स्त्रीवादी सिद्धांत आणि सामाजिक इतिहासावरील लिखाण गाजले. शैक्षणिक लेखनाव्यतिरीक्त त्या वृत्तपत्रांतही लिहित असत. कथा, कविता आणि कादंबरीलेखनासाठी त्या सुपरिचित होत्या.

भागवत यांची पहिली कादंबरी ‘आरपारावलोकिता’ २० एप्रिल २०१९ रोजी हरिती प्रकाशनाने प्रकाशित केली. या कादंबरीत महाराष्ट्रातील स्त्री-प्रश्नाची गुंतागुंत आहे. ‘मानवशास्त्रातील लिंगभावाची शोध मोहीम’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांनी पुणे विद्यापीठात स्त्री अभ्यास केंद्र सुरू केले आणि वाढविले. तसेच त्यांची ‘वाढत्या मूलत्ववादाला शह : सुसंवादी लोकशाहीच्या दिशेने,‘स्त्रीवादी सामाजिक विचार’, स्त्री प्रश्नांची वाटचाल, मी बाई आहे म्हणून..., मानवशास्त्रातील लिंगभावाची शोधमोहिम, पोटगीचा कायदा : तरतूद आणि वास्तव, स्त्रीवादी पध्दतीशास्त्र, शेतकरी महिला आणि पंचायत राज्य, स्त्री जीवनाची गुंतागुंत, अब्राह्मणी स्त्रीवादी इतिहास लेखणाच्या दिशेने, समकालीन भारतीय समाज, Women's Studies (इंग्रजी), स्त्रियांचे मराठीतील निबंधलेखन, भारतातील मुस्लिम स्त्री प्रश्नांचा इतिहास आदी पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत. त्यांचे ‘स्त्रीवादी सामाजिक विचार’ हे पुस्तक पाश्चिमात्य जगातील स्त्रीवादी विचारांचा परिचय करून देणारे आहे. पाश्चात्य जगातील स्त्रीवादाची पायाभरणी करणाऱ्या या पुस्तकातील सहा विचारवंतांनी आपल्या काळातील सामाजिक-राजकीय प्रश्नांमध्ये रस घेऊन, कृती करून, आपला विचार मांडला आहे. त्यामुळे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरले. भागवत या भाषाशास्त्र, साहित्य, समाजशास्त्र, शिक्षण आणि स्त्रीविषयक अभ्यास अशा विविध विषयांमध्ये ज्ञानदान आणि संशोधनकार्यात व्यग्र होत्या. 
विविध भारतीय भाषांमधील लेखिकांचे साहित्य एकत्र आणणार्‍या ‘विमेन्स रायटिंग इन इंडिया’ या प्रकल्पाच्या त्या संपादक होत्या. हा प्रकल्प भारतातील स्त्रीवादी अभ्यास प्रवासात महत्त्वाचा ठरला. हैदराबाद येथील ‘अन्वेषी’ या स्त्रीवादी संघटनेच्या कार्यालयात झालेल्या या प्रकल्पाचे सुसी थारू आणि के. ललिता यांनी नेतृत्व केले होते. भागवत यांनी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधून विपुल लेखन केले आहे. सामाजिक चळवळी, मध्ययुगीन आणि आधुनिक महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास त्यातून मांडला गेला. शिवाय स्रीवादी साहित्याच्या अभ्यास, स्त्रीवादी विचार आणि सिद्धांत, तसेच स्त्रीवादी अभ्यासशाखेच्या संदर्भाने येणारे प्रश्नही समोर आले. स्त्रीवादाचा मूळ स्त्रोत या दृष्टिकोनातून त्यांनी संत कवयित्रींच्या काव्यासंबंधीही अभ्यास केला.  महाराष्ट्रातील लिंगभेदविषयक सामाजिक इतिहासावर त्या सातत्याने लिहित असत.
भागवत यांनी महाराष्ट्रात झालेल्या अनेक सामाजिक चळवळींत सक्रिय सहभाग घेतला होता. महिलांच्या चळवळींपासून ते दलित व गरीब शेतकर्‍यांच्या चळवळींपर्यंत त्यांनी त्यांचा बारकाईने अभ्यासही केला होता. ऐतिहासिक, साहित्यिक आणि लिंगभेदाबाबत लिहिताना प्रदेश हा विभाग महत्त्वाचा असतो, अशी भूमिकाही त्यांनी  वेळोवेळी मांडली होती. अनेक भाषांतर प्रकल्पांमध्येही भागवत यांचा सक्रिय सहभाग असायचा. 
---------------------
या पुरस्काराने त्यांचा गौरव
भागवत यांना ‘स्त्री प्रश्नाची वाटचाल’ या पुस्तकाच्या लेखनासाठी २००४–०५ सालचा समाजविज्ञान कोश पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना २००६ सालच्या महाराष्ट्र सारस्वत गौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. 
---------------------

Web Title: Senior Feminist Writer Dr Vidyut Bhagwat passed away in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.