ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे पुण्यात निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 07:55 PM2020-03-09T19:55:57+5:302020-03-09T20:40:41+5:30
पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीड व मनमिळाऊ पत्रकार अशी अनंत दीक्षित यांची ओळख होती.
पुणे : ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकमत’च्यापुणे आवृतीचे माजी संपादक अनंत दीक्षित (वय ६७) यांचे सोमवारी सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, कन्या, जावई असा परिवार आहे. गेली ३० ते ३५ वर्षे पत्रकारीतेच्या क्षेत्रातील विविध पदांवर अनंत दीक्षित कार्यरत होते. बुधवारी सकाळी ९ वाजता दीक्षित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी काही वर्षे काम केले. त्याआधी ते ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचे व नंतर पुणे आवृत्तीचे संपादक होते. विविध वृत्त वाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून ते परिचित होते. पुणे, कोल्हापूरसह विविध शहरातील अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा संबंध होता. त्यांनी राज्यभरात विविध विषयांवर व्याख्याने दिली होती. त्यांचा जनसंपर्क उत्तम होता.
पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याबद्दल अनंत दीक्षित यांचा अनेक संस्थांच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांच्या वतीने २०१६ मध्ये त्यांना स्व. जवाहरलाल दर्डा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गेल्या डिसेंबर २०१९ मध्ये कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावलेली होती. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात जाणे थांबविले होते. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या मुलीचे अलिकडेच दीर्घ आजाराने निधन झाले होते.