ज्येष्ठ वकिलास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:17 AM2017-08-10T03:17:19+5:302017-08-10T03:17:19+5:30

शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या एका दाव्यात उलटतपासणी घेत असताना विचारलेल्या प्रश्नांमुळे चिडून माजी नगरसेवक कैलास गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ वकिलाला न्यायालयाबाहेर नेत मारहाण केली. त्यांच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड काढून घेतली.

Senior lawyer killed |  ज्येष्ठ वकिलास मारहाण

 ज्येष्ठ वकिलास मारहाण

Next

पुणे : शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या एका दाव्यात उलटतपासणी घेत असताना विचारलेल्या प्रश्नांमुळे चिडून माजी नगरसेवक कैलास गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ वकिलाला न्यायालयाबाहेर नेत मारहाण केली. त्यांच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. गायकवाड यांनी रिव्हॉल्वर रोखून त्यांना मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात खळबळ उडाली. या प्रकरणी गायकवाड यांच्यासह ५ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
राजेंद्र विटणकर (६३, रा. कर्वेनगर) असे मारहाण झालेल्या वकिलांचे नाव आहे.
दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. दिवाणी न्यायालयात वादी सुनील मोहोळ आणि प्रतिवादी नामदेव मोहोळ यांच्यात मुळशी येथील एका जमिनीचे खरेदीखत रद्द करण्याबाबत सुनावणी सुरू आहे.
विटणकर सुनील माहोळ यांच्यावतीने काम पाहात आहेत. गायकवाड पाचव्या क्रमांकाचे प्रतिवादी असून त्यांची उलटतपासणी सुरू होती. विटणकर वादीतर्फे त्यांची उलटतपासणी घेत होते. त्यावेळी विटणकर यांनी त्यांना प्रश्न विचारत होते. मात्र, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे गायकवाड यांना राग आला. त्यांनी विटणकर यांना ‘मला ओळखत नाही का? बाहेर चल, बघून घेतो’ अशी धमकी दिली.
दरम्यान, पुणे बार असोसिएशनने या घटनेचा बैठक घेऊन निषेध केला. गायकवाड यांचे वकिलपत्र कोणीही वकिलाने घेऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
के. आर. शहा, मिलिंद पवार, सुभाष पवार, असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र दौंडकर, उपाध्यक्ष हेमंत झंजाड यांच्यासह ओंकार चव्हाण, संतोष जाधव, विवेक भरगुडे, कुमार पायगुडे, अमित खोत, चेतन भुतडा आदी उपस्थित होते.

पिस्तुल रोखले : मारहाण करून शिवीगाळ
सुनावणी संपल्यानंतर विटणकर न्यायालय कक्षाच्या बाहेर आले. त्यावेळी गायकवाड आणि त्यांच्यासोबत असलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना गेट नंबर तीनच्या बाहेर बळजबरीने नेले. तेथे मारहाण करून शिवीगाळ केली. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला इजा झाली. त्यानंतर गायकवाड यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वर रोखले. इतर साथीदारांनी त्यांच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड काढून घेतली. त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवत असताना तेथे वकिलांची गर्दी जमली. तेव्हा गायकवाड व साथीदार पसार झाले. या प्रकरणी विटणकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Senior lawyer killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.