ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन काळाच्या पडद्याआड; साहित्य विश्वाला पन्नास वर्षांचे योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 02:22 PM2021-11-12T14:22:24+5:302021-11-12T14:22:58+5:30
पडद्याआड तर कधी पडद्यापुढे आत्मविश्वासाने वावरलेले मोमीन यांनी आजपर्यंत गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारात विपुल असे लिखाण केले आहे.
लोहगाव : विमाननगर येथील ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर उर्फ बशीर कमरूद्दिन मोमीन (वय ७९) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार अन्वर मोमीन यांचे ते वडील होत. लोककलेतील त्यांच्या पन्नास वर्षांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वोच्च प्रतिष्ठित विठाबाई नारायणगावकर या पाच लाख रुपयांच्या पुरस्काराने त्यांना गौरविले होते.
पडद्याआड तर कधी पडद्यापुढे आत्मविश्वासाने वावरलेले मोमीन यांनी आजपर्यंत गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारात विपुल असे लिखाण केले आहे. त्यांच्या लिखानावर पुणे विद्यापीठात प्रा. कसबे यांनी पीएचडी मिळवली आहे. तर मोमीन कवठेकरांनी लोककलावंतावर लिहिलेले पुस्तक संदर्भ म्हणून अभ्यासकांकडून वापरले जाते.
कवठेकरांच्या लेखणीतून अवतरलेले साहित्य प्रकार:
पद्य प्रकार: गण, गवळण, लावण्या, भावगीते, भक्तिगीते, भारूडे, सद्यस्थिती वर्णन करणारी लोकगीते, पोवाडे, कविता, बडबडगीते, कलगीतुरा, देशभक्तिपर गीते, मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन, मराठी गाण्यांच्या अल्बमसाठी लेखन, जनजागृती करणारी गीते.
गद्य प्रकार ः आकाशवाणीवर प्रसारीत लोकनाट्य - हुंडाबंदी, व्यसनबंदी, एड्स, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मुलन, साक्षरता अभियान.
वगनाट्य : भंगले स्वप्न महाराष्ट्रा, भक्त कबीर, सुशीला मला क्षमा कर, बाईन दावला इंगा, इष्कान घेतला बळी, तांबड फुटल रक्ताच.
ऐतिहासिक नाटके : वेडात मराठे वीर दौडले सात, लंका कुणी जाळली, भंगले स्वप्न महाराष्ट्रा.
कविता संग्रह : प्रेमस्वरूप आई.
अभिनय: नेताजी पालकर नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका, भ्रमाचा भोपऴा नाटकात तृतीयपंथीयाची भुमिका, भंगले स्वप्न महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची भुमिका.
प्रकाशित झालेले मराठी अल्बम : रामायण कथा, अष्टविनायक गीते, नवसाची येमाई ः भाग एक व भाग दोन, सत्वाची अंबाबाई, वांग्यात गेली गुरं, कर्हा नदीच्यी तीरावर, येमाईचा दरबार आदी.
कलावंत संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष. यामार्फत अनेक लोककलावंतांना शासनाचे मानधन मिळवून देण्यासाठी पुढाकार. त्यासाठी विविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागला.
मिळालेले पुरस्कार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राज्य शासनाचा जिल्हा व्यसनमुक्ती प्रचार कार्य पुरस्कार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पद्मश्री विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार २०१२ ( रूपये एक्कावण्ण हजारांचा), लोकनेते गोपीनाथ मुंडे जीवनगौरव पुरस्कार - २०१८ (रुपये अकरा हजार), सिने अभिनेते अमोल पालेकर यांच्या हस्ते छोटु जुवेकर पुरस्कार - मुंबई (१९८०), सिनेअभिनेते निळु फुले यांच्या हस्ते ग्रामवैभव पुरस्कार (१९८१)