ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचं दीर्घ आजारानं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 07:16 AM2017-10-02T07:16:30+5:302017-10-02T08:14:42+5:30
प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात वयाच्या 77 व्या वर्षी मराठे यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुणे : प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात वयाच्या 77 व्या वर्षी मराठे यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हजर केलं होतं. आज पहाटे 1 :45 वाजता त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सोमवारी सकाळी 9 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही वेगळ्या वळणाची दीर्घ कथा लिहून ते प्रकाशात आले. चिपळूणला भरणाऱ्या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली.
ह.मो. मराठे यांचा जन्म २ मार्च १९४० रोजी झाला. हमो या टोपण नावाने ते ओळखले जात होते. वैचारिक नसलेल्या त्यांच्या काही कथा कादंबऱ्यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव येतो. हमोंना त्यांच्या भावाने वयाच्या 10-12 व्या वर्षी शाळेत घातले. एम.ए.पर्यंत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले साहित्य म्हणजे 1956 साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या 1969 साली प्रसिद्ध झालेल्या ह्णनिष्पर्ण वृक्षावर भर दुपारीह्ण या कादंबरीने. ही कादंबरी पुढे1972 साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.
ह.मो. मराठेंच्या काळेशार पाणी ही कादंबरीही आधी साधनात आणि नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाली. काळेशार पाणीमधले काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत असा आरोप झाला होता.
प्रकाशित साहित्य -
- अण्णांची टोपी (कथासंग्रह)
- आजची नायिका (उपरोधिक)
- इतिवृत्त
- इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह)
- उलटा आरसा (उपरोधिक)
- एक माणूस एक दिवस (भाग १ ते ३)
- कलियुग
- काळेशार पाणी : संहिता आणि समीक्षा (वैचारिक)
-घोडा
- चुनाव रामायण (व्यंगकथा)
- ज्वालामुख (कथासंग्रह)
- टार्गेट
- द बिग बॉस (व्यंगकथा)
- दिनमान (उपरोधिक लेख)
- देवाची घंटा
- न लिहिलेले विषय (वैचारिक)
- निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (१९७२)
- न्यूज स्टोरी
- पोहरा (आत्मकथा; ह्णबालकांडह्णचा २रा भाग)
- बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग - पोहरा)
- बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक - ह.मो. मराठे)
- मधलं पान (लेखसंग्रह)
- मार्केट (१९८६)
- मुंबईचे उंदीर (व्यंगकथा)
- माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा)
- युद्ध
- लावा (हिंदी)
-वीज (बाल साहित्य)
- श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा)
- सॉफ्टवेअर
- स्वर्गसुखाचे (विनोदी)
- हद्दपार
- आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी