ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 02:16 PM2020-08-19T14:16:17+5:302020-08-19T14:17:09+5:30

संस्कृत, प्राकृत भाषांचे महर्षी, तसेच ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि पारशी धर्मग्रंथ असलेल्या झेंद अवेस्थाचे डॉ. मेहेंदळे हे अभ्यासक होते.

Senior Oriental Researcher Dr. Madhukar Anant Mehendale was passed away in Pune | ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन 

ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन 

Next
ठळक मुद्देमहाभारताच्या संपादित आवृत्तीसाठी केलेले काम,महाभारताची सांस्कृतिक सूचीसाठी विशेष ओळख

पुणे : ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचे बुधवारी पुण्यात वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ते १०२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त सनदी अधिकारी लीना मेहेंदळे यांचे ते चुलत सासरे होत.

डॉ. मेहेंदळे हे संस्कृत, प्राकृत भाषांचे महर्षी, तसेच ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि पारशी धर्मग्रंथ असलेल्या झेंद अवेस्थाचे अभ्यासक होते. त्यांनी भांडारकर प्राच्यविद्या संस्थेसाठी महाभारताच्या चिकित्सक संपादित आवृत्तीसाठी केलेले काम आणि महाभारताची सांस्कृतिक सूची यांच्यासाठी विशेष ओळख आहे. डॉ. मेहेंदळे यांचे कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत आणि डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स हे दोन ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मेहेंदळे यांनी मराठी, इंग्लिश आणि संस्कृत अशा तिन्ही भाषांतील ग्रंथलेखन, संशोधन निबंध लिहिलेले आहेत. त्यांना २०१७ साली साहित्य अकादमीच्या भाषा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय, मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्वही त्यांना बहाल करण्यात आले.

डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे यांचा जन्म १४ फेब्रुवारी, १९१८ रोजी झाला.  मेहेंदळे यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवी मिळवली आणि १९४३ साली डेक्कन कॉलेजमधून पीएच.डी. संपादन केली. काहीच वर्षांत त्यांचा प्राकृत शिलालेखांचे ऐतिहासिक व्याकरण हा पीएचडीचा शोधप्रबंध त्याच कॉलेजने प्रसिद्ध केला. हे पीएच.डी झाल्यावर मेहेंदळे यांनी कर्नाटक आणि गुजरातमधील महाविद्यालयांत, पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृत विषय शिकवला. त्यांनी जर्मनी आणि अमेरिकेतील संस्थांमध्येही अभ्यास केला. डेक्कन कॉलेजमधून निवृत्त झाल्यानंतर डॉ. रा.ना. दांडेकर यांच्या आग्रहावरून भांडारकर संस्थेत ते रुजू झाले. तेथे त्यांनी महाभारतावर संशोधन केले.

मेहेंदळे यांनी लिहिलेले अनेक शोधनिबंध संदर्भासाठी उपयुक्त आहेत. शब्द आणि त्यांचे संदर्भानुसार बदलणारे अर्थ यांवरही त्यांचे निबंध आहेत. 'सत्यमेव जयते' हे भारताचे ब्रीदवाक्य आणि मुंडकोपनिषदातील 'सत्यमेव जयते नानृतं' यांतील संदर्भानुसार बदलणारा अर्थ त्यांनी दाखवून दिला. 'प्राचीन भारत : समाज आणि संस्कृती' या विषयावरील त्यांच्या व्याख्यानमालेला वाईच्या प्रज्ञापाठशाळेने छापले व याच शीर्षकाचा ग्रंथही प्रकाशित केला. या ग्रंथामध्ये महाभारतातील कथा, रूपके तसेच वेदांतील वृत्र कथा, वेद आणि अवेस्था अशा विविध विषयांवर अभ्यासपूर्ण परंतु समजण्यास सोप्या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे.

 
-------
लेखनप्रपंच :

अशोकाचे भारतातील शिलालेख (मराठी, १९४८)

कल्चरल इंडेक्स ऑफ महाभारत (इंग्रजी)

डिक्शनरी ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स (इंग्रजी)

मराठीचा भाषिक अभ्यास (मराठी)

रिफ्लेक्शन्स ऑफ संस्कृत ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स (इंग्रजी)

वरुणविषयक विचार (मराठी)

वेदा मॅन्युस्क्रिप्ट्स (इंग्रजी)

प्राचीन भारत – समाज आणि संस्कृती (मराठी)

हिस्टॉरिकल ग्रामर ऑफ इन्स्क्रिप्शनल प्राकृत (इंग्रजी)

Web Title: Senior Oriental Researcher Dr. Madhukar Anant Mehendale was passed away in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.