ज्येष्ठ ‘हस्तलिखित’काराचे ‘कॅलिग्राफी’त ग्रंथ; दहा वर्षांपासून लेखनव्रत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 01:53 PM2020-03-03T13:53:31+5:302020-03-03T13:55:09+5:30
सध्याच्या ‘स्मार्ट फोन’च्या जमान्यात तरुण पिढीने तर लेखनाकडे काहीशी पाठच फिरविली आहे.
नम्रता फडणीस -
पुणे : ‘लेखन’ ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. लिखाणात सातत्य, संयम, सुलेखन, मेहनत अशा गोष्टींची नितांत आवश्यकता असते. त्यामुळेच बरेचसे लोक लेखनाच्या फारसे भानगडीत पडत नाहीत. सध्याच्या ‘स्मार्ट फोन’च्या जमान्यात तरुण पिढीने तर लेखनाकडे काहीशी पाठच फिरविली आहे. मात्र, या तंत्रज्ञानाच्या युगातही ७० वर्षीय व्यक्तीने जवळपास १७ आध्यात्मिक ग्रंथ तेही ‘कॅलिग्राफी’मध्ये लिहून पूर्ण केले आहेत, असे सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. या लेखनवेड्या ‘हस्तलिखित’काराचे नाव आहे, ‘सदाशिव यशवंत वाळिंबे’!
वडगाव धायरी येथे वास्तव्यास असलेले वाळिंबे यांनी दहा वर्षांपासून हे लेखनव्रत अंगीकारले असून, या धार्मिक ग्रंथलेखनातून त्यांची अनोखी आध्यात्मिक सेवा घडत आहे. गुलबर्ग्याच्या कडगंची येथील देवस्थानामधील सायंदेव साखरे यांच्या मूळ ‘गुरुचरित्र’ हस्तलिखिताचे पुनर्लेखन करण्याचा मानही त्यांना मिळाला असून, गाणगापूरच्या देवस्थानातर्फे त्यांच्यावर पुन्हा ‘गुरुचरित्र’लेखन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आजपर्यंत वाळिंबे यांनी दोनदा गुरुचरित्राचे लेखन केले असून, सध्या तिसºयांदा ते गुरुचरित्र लिहीत आहेत. या लेखनाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या लेखनकार्याविषयी सदाशिव वाळिंबे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता ‘या ग्रंथलेखनातून आत्मिक समाधान मिळत असल्याची भावना’ त्यांनी व्यक्त केली.
वाळिंबे म्हणाले, ‘‘निवृत्तीनंतर आमच्या काही मित्रमंडळींचे ‘श्रीमद्भागवत महापुराणा’चे पारायण करायचे ठरले. मात्र, त्यापूर्वी आम्ही आळंदी आणि देहूला जायचे ठरविले. देहूमध्ये संत तुकारामांची गाथा फरशीवर कोरल्याचे पाहिले आणि तिथूनच लेखनाची प्रेरणा मिळाली. ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकाराम गाथा’ यापासून लेखनाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर अनेक ग्रंथांची लेखनपूर्ती झाली आहे.
............
मी सुरुवातीला धार्मिक नव्हतो; पण लेखनामुळे मला अध्यात्माची गोडी लागली. ‘कडगंची’साठी पुनर्लेखन करण्याची संधी मिळाली, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे.- सदाशिव यशवंत वाळिंबे, ‘हस्तलिखित’कार