Rambhau Joshi Passed Away: पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचं निधन
By श्रीकिशन काळे | Updated: January 24, 2025 10:53 IST2025-01-24T10:49:56+5:302025-01-24T10:53:27+5:30
केवळ मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण होऊनही आपल्या परिश्रम, जिद्द, अभ्यास, कार्यनिष्ठा आणि लोकसंग्रह यांच्या बळावर पत्रकारितेप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी अव्वल दर्जाचे यश मिळवले

Rambhau Joshi Passed Away: पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचं निधन
पुणे: मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांचे गुरूवारी (दि.२३) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे वय १०१ वर्षे होते. त्यांचेमागे दोन कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील पत्रकार नगरात शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर वैकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
केवळ मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण होऊनही आपल्या परिश्रम, जिद्द, अभ्यास, कार्यनिष्ठा आणि लोकसंग्रह यांच्या बळावर पत्रकारितेप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी अव्वल दर्जाचे यश मिळवले. पुण्याच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सव मध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या नव्या इमारतीसाठी त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांनी सन १९५० मध्ये पत्रकारितेत प्रवेश केला आणि त्यानंतर पुणे येथे सायं. दैनिक ‘लोकराज्य’, दै. संध्या, दैनिक केसरीत उपसंपादक, प्रमुख वार्ताहर, सहसंपादक, अशा विविध पदांवर काम केले. काम करताना पत्रकारितेच्या क्षेत्रात एक आगळा ठसा उमटवला. त्यांनी चौफेर पत्रकारिता करण्यासाठी गुंतून न पडता संधीचा लाभ घेऊन आसेतु हिमाचल अशी देशातील सर्व राज्य, प्रदेश त्यांनी आपले कार्यक्षेत्र बनविले होते. १९६५ च्या भारत-पाक युध्दाच्या वेळी ते केसरीचे प्रतिनिधी म्हणून पंजाबात तळ ठोकून राहिले. युध्द आघाड्यांवर हिंडले. बांगला युद्धाच्या वेळी त्यांनी कलकत्त्याकडे धाव घेतली. अहमदाबाद, जळगाव, भिवंडी, औरंगाबाद, मुंबई वगैरे ठिकाणी जेथे जेथे जातीय दंगली उसळल्या तेथे तेथे जाऊन स्व. रामभाऊंनी प्रसंगी धोका पत्करून वाचकांपर्यंत सचित्र इतिवृत्त पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे पार पाडली. पत्रकार या नात्याने काम करीत असताना त्यांनी प्रचंड लोकसंग्रह केला.
कृतिशील पत्रकारिता करीत असतानाच पत्रकार संघटनांच्या कार्यात त्यांनी आपला सहभाग दिला. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे सलग चार वर्षे अध्यक्ष, तसेच इंडियन फेडरेशन ऑफ जर्नालिस्ट या अ.भा.संघटनेच्या कौन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. स्व. रामभाऊंचे सहा ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यातील ‘यशवंतराव - इतिहासाचे एक पान’ हा चरित्रात्मक ग्रंथ सर्वमान्य ठरला होता. याखेरीज स्व. सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जीवनावरील ‘ही ज्योत अनंताची’ हे त्यांचे पुस्तक प्रसिध्द झाले आहे. त्यांच्याकडे गोंदवलेकर महाराजांच्या पादुका असून ते त्यांचे भक्त होते. साहित्य, राजकारण, संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचा सहभाग आजही आदर्श असाच होता. पत्रकारिता क्षेत्रातील विद्यापीठच हरवले असल्याची भावना जेष्ठ पत्रकार सुभाष इनामदार यांनी व्यक्त केली.