ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ डॉ. त्रि. ना. धर्माधिकारी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:13 AM2021-09-04T04:13:59+5:302021-09-04T04:13:59+5:30
पुणे : ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ आणि वैदिक संशोधन मंडळाचे माजी सचिव डॉ. त्रिविक्रम नारायण ऊर्फ त्रि. ना. धर्माधिकारी (वय ९०) ...
पुणे : ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ आणि वैदिक संशोधन मंडळाचे माजी सचिव डॉ. त्रिविक्रम नारायण ऊर्फ त्रि. ना. धर्माधिकारी (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
धर्माधिकारी यांचा जन्म २ मे १९३१ रोजी एरंडोल (जि. धुळे) येथे झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बालमुकुंद संस्कृत महाविद्याालयातून १९५४ मध्ये त्यांनी साहित्य विशारद ही पदवी संपादन केली. पुणे विद्यापीठातूनच ते एम.ए. झाले. यजुर्वेदाच्या मैत्रायणी संहितेची भाषा आणि कर्मकाण्ड या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. संपादन केली. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रासाठी समग्र बौधायन श्रौतसूत्राची भवस्वामी भाष्यासहित चिकित्सक आवृत्ती त्यांनी संपादित केली आहे.
वैदिक संशोधन मंडळाकडून प्रकाशित झालेल्या चार हजारांहून अधिक हस्तलिखित पोथ्यांची सूची, हीरकमहोत्सवी ग्रंथ, यज्ञायुधानि, मैत्रायणी संहिता, इट्स रिचुअल ॲॅण्ड लँग्वेज या प्रकाशनांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. भारतामध्ये आणि परदेशात अनेक ठिकाणी व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे, बीजभाषणे इत्यादी रूपांनी त्यांनी मौलिक लेखन केले. पुण्यातील वैदिक संशोधन मंडळ या संस्थेतून धर्माधिकारी यांची संशोधक म्हणून कारकीर्द सुरू झाली. १९५७ ते १९९३ अशी ३६ वर्षे ते संशोधक आणि संपादक म्हणून कार्यरत होते, तर १९६७ ते १९९१ या काळात मंडळाच्या सचिवपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. केंद्र सरकारने १९८३ मध्ये वैदिक संशोधन मंडळाला ‘आदर्श संस्कृत शोध संस्था’ म्हणून मान्यता दिली. तेव्हापासून सन १९९३ पर्यंत या संस्थेचे संचालकपदही डॉ. धर्माधिकारी यांच्याकडे होते.
प्राच्यविद्या क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल धर्माधिकारी यांना राष्ट्रपती पुरस्कार, शृंगेरी शारदापीठाचा पुरस्कार, वेदरत्न पुरस्कार, श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार, पुरुषोत्तम पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. दिल्ली येथील लाल बहादूर शास्त्री केंद्रीय विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट. पदवी प्रदान केली होती.