'सोवळे'प्रकरणी डॉ. मेधा खोलेंना अटक करा, मराठा क्रांतीचा 25 सप्टेंबरला मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 02:47 PM2017-09-13T14:47:01+5:302017-09-13T14:50:51+5:30
हवामान खात्याच्या तत्कालीन संचालिका डॉ.मेधा खोले यांना त्वरित अटक करुन कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती 25 सप्टेंबरला पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.
पुणे, दि. 13 - हवामान खात्याच्या तत्कालीन संचालिका डॉ.मेधा खोले यांना त्वरित अटक करुन कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी मराठा क्रांती 25 सप्टेंबरला पुणे पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. मेधा खोले यांनी मराठा जातीचा अवमान करुन निर्मला यादव यांची मानहानी केली. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणे, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लघंन करणे, अंधश्रद्धा पसरवणे, उच्च निचता पाळणे, भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन करणे आदी कारणांमुळे डॉ.मेधा खोले यांना त्वरीत अटक करून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी येत्या 25 सप्टेंबर रोजी मराठा क्रांतीतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मराठा समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी या मोर्चा काढण्यात येणार असल्याचं मराठा क्रांतीकडून सांगण्यात येत आहे. लाल महाल ते पुणे पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच हा मूक मोर्चा नसून यात बहुजन आणि पुरोगामी संघटनादेखील सहभागी होणार आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
‘सोवळं मोडलं’ म्हणून डॉ. मेधा खोले यांनी त्यांच्या घरी स्वंयपाक करणा-या निर्मला यादव (वय ५०) यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिली. या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले. यादव यांनी ‘कुलकर्णी’ आडनाव सांगून आपल्याकडे नोकरी मिळवली आणि सुवासिनी आहे, असे सांगून आपल्या घरी स्वयंपाक केला’, अशी तक्रार डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंदवली होती. पोलिसांनी यावरून यादव यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. तर ‘मी खोटे नाव सांगून नोकरी मिळवलेली नाही. उलट डॉ. खोले यांनी माझ्या घरी येऊन मला मारहाण केली,’अशी परस्परविरोधी तक्रार निर्मला यादव यांनी अभिरुची पोलीस ठाण्यात दाखल केली. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांची भेट घेऊन खोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ‘देव बाटला, सोवळे मोडले’ म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार करणा-या डॉ. खोले यांनी संविधानाचा अपमान केला असून त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ब्रिगेडने केली. दरम्यान, यानंतर मराठा क्रांती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसची युवती शाखा, शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने वेधशाळा व डॉ. खोले यांच्या घरासमोर निदर्शने केली होती.