ज्येष्ठ गायिका कुसूम शेंडे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 05:36 PM2019-08-28T17:36:12+5:302019-08-28T17:39:00+5:30
संगीत रंगभूमी समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेल्या प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री कुसुम गोपीनाथ शेंडे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले
पुणे : संगीत रंगभूमी समृद्ध करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिलेल्या प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री कुसुम गोपीनाथ शेंडे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी रात्री निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. शेंडे यांच्या पश्चात प्रसिद्ध उपशास्त्रीय गायक डॉ. संजीव शेंडे व विधिज्ञ राजीव शेंडे हे दोन पुत्र तसेच सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे-साठ्ये व प्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे या त्यांच्या नाती होत. शेंडे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुसुम शेंडे यांचा जन्म १२ डिसेंबर १९२९ रोजी झाला. पुण्यातील जुन्या पिढीतील प्रख्यात सर्जन डॉ. के. सी. घारपुरे आणि ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’च्या (पीडीए) अभिनेत्री तारामती घारपुरे यांच्या त्या कन्या. महाविद्याालयीन दशेत त्यांनी पं. हजारीलाल यांच्याकडे कथक नृत्याचे धडे गिरवले. नंतर त्या गायनाकडे वळाल्या. स्वरराज छोटा गंधर्व, सरस्वती राणे आणि ठुमरी गायिका शोभा गुर्टू यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली. संगीत रंगभूमीवर त्यांची कारकीर्द गाजली. संशयकल्लोळ नाटकातील ‘रेवती’च्या भूमिकेने त्यांना लोकप्रियता दिली.
‘मृच्छकटिक’,‘सौभद्र’,‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’ आणि ‘मंदारमाला’ या नाटकातील त्यांच्या अभिनय आणि गायनाला रसिकांची दाद मिळाली. स्वरराज छोटा गंधर्व, पं. राम मराठे, प्रसाद सावकार आणि रामदास कामत यांच्यासमवेत त्यांनी संगीत नाटकातून नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. महाराष्ट्र सरकारचा सलग तीन वर्षे पुरस्कार पटकाविणा-या त्या संगीत रंगभूमीवरील पहिल्या गायिका-अभिनेत्री ठरल्या.
पुत्र संजीव शेंडे लिखित ‘वैरीण झाली सखी’आणि ‘आम्रपाली’ या नाटकांतून त्यांनी नायिकेची भूमिका साकारली होती. संगीत नाटकातून निवृत्त
झाल्यानंतर कुसुम शेंडे यांनी संगीत विद्यादानाचे काम केले. ‘भीमपलास, ‘चारुकेशी’आणि ‘धानी’ रागातील बंदिशींची निर्मिती त्यांनी केली.