ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताताई रानडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 05:30 PM2018-12-05T17:30:15+5:302018-12-05T19:43:16+5:30

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, लोकशाही उत्सव समिती अशा अनेक गटांबरोबर त्या कार्यरत होत्या.

senior Social Worker Shantai Ranade passes away | ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताताई रानडे यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताताई रानडे यांचे निधन

Next

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ.शांताताई मधुकर रानडे यांचे बुधवारी (दि.5) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पुण्यातील साठे हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगी सुषमा दातार, जावई,डॉ.अभय दातार,सुजय दातार हे नातू आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, लोकशाही उत्सव समिती अशा अनेक गटांबरोबर त्या कार्यरत होत्या.त्यांचे वडील कै. गणेश रामचंद्र साठे हे जुन्या पिढीतील साठे बिस्कीट कंपनीचे संस्थापक आणि नामवंत कारखानदार होते. कॉ. रानडे यांचे शिक्षण एस.एन.डी.टी महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन काळातच त्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊ लागल्या आणि मार्क्सवादाकडे आकर्षित झाल्या आणि १९४७ पासून मृत्युपर्यंत त्या भाकपच्या सक्रिय सदस्य होत्या. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या त्या काही काळ सदस्य होत्या. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, भाई विष्णुपंत चितळे, कॉ. ए.बी. बर्धन, कॉ. गीता मुखर्जी आदिंसोबत त्यांनी काम केले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीचा सत्याग्रह, बेळगाव सत्याग्रह यांच्यात त्यांचा सहभाग होता आणि त्यासाठी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. तसेच पक्षाच्या विविध आंदोलनांदरम्यान देखील त्यांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. कॉ. रानडे यांचा भारतीय महिला फेडरेशन, श्रमिक महिला समिती आदि विविध महिला संघटनांच्या कामात सक्रीय सहभाग होता. तसेच पुण्यातील विविध डाव्या लोकशाहीवादी संस्था-संघटना यांच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. गेली अनेक वर्ष पुण्यात आयोजित होत असलेल्या लोकशाही उत्सवाच्या आयोजनात त्या पहिल्यापासून सहभागी होत्या. कॉ.रानडे या रशियन अभ्यासक होत्या. त्यांनी मॉस्को विद्यापीठातून रशियन भाषेच्या अध्यापनाचा अभ्यासक्रम पुर्ण केला तसेच पुणे विद्यापीठातून रशिन विषयात एम.ए केले. पुण्यात त्यांनी काही काळ रशियन भाषेचे अध्यापन केले. नामवंत रशियन कादंबरीकार कॉन्सटांटिन पाऊस्तोवस्की यांच्या एका कादंबरीचा मराठीमध्ये ह्यसागराचा जन्म या नावाने अनुवाद केला होता. या अनुवादासाठी त्यांना सोव्हिएट लँड नेहरु पुरस्कार मिळाला होता. या बरोबरच त्यांनी इतर अनेक पुस्तिका लिहिल्या आहेत तसेचअनेक पुस्तकांची भाषांतरे केली आहेत. महाराष्ट्र भाकपच्या युगांतर या मुखपत्रासाठी त्या नियमितपणे लेख अनुवादित करीत असत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिक वेळ पार्थिव शरीर ठेवता येणार नसल्याने ते घरी न नेता, आज सायंकाळी सातच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

Web Title: senior Social Worker Shantai Ranade passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.