ज्येष्ठ तंत्र सल्लागार पद्माकर लाटे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:08 AM2021-06-26T04:08:41+5:302021-06-26T04:08:41+5:30
दिल्ली येथे केंद्र सरकारच्या तंत्र विकास विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. निवृत्तीनंतर लाटे पुण्यात स्थायिक झाले. फर्ग्युसन महाविद्यालयातून ...
दिल्ली येथे केंद्र सरकारच्या तंत्र विकास विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. निवृत्तीनंतर लाटे पुण्यात स्थायिक झाले. फर्ग्युसन महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर लाटे यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. पन्नासच्या दशकात इंग्लंड येथून परतल्यानंतर त्यांनी दिल्ली येथे केंद्रीय उद्योग मंत्रालयात सेवेस आरंभ केला. केंद्रीय नियोजन आयोगावर तांत्रिक सल्लागार म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. संयुक्त राष्ट्र संघामार्फत केनिया सरकारचे सल्लागार म्हणूनही त्यांंनी काम पाहिले.
‘लायसन्स राज’ या शब्दप्रयोगाचा वापर सुरु होण्यापूर्वीपासूनच त्यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून उद्योगस्नेही धोरणे आखण्यास प्राधान्य दिले. निवृत्तीनंतर त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या संचालक मंडळावर तांत्रिक सल्लागार म्हणून काम केले. देशात प्रथमच स्थापन झालेल्या आयसीआरए या क्रेडिट रेटिंग संस्थेचे ते सदस्य होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ‘अपटेक’ प्रकल्पाचे ते विशेष सल्लागार होते.