ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना साहित्य व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांची श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 08:01 PM2023-08-09T20:01:29+5:302023-08-09T20:02:15+5:30

समाजमाध्यमांवरही ते ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध होते. परखड व साधार मते ते व्यक्त करत असत...

Senior thinker Prof. Tribute to Hari Narke by dignitaries from literary and social fields | ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना साहित्य व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांची श्रद्धांजली

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांना साहित्य व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांची श्रद्धांजली

googlenewsNext

पुणे : ज्येष्ठ विचारवंत, पुरोगामी विचारांचे संशोधक, महात्मा फुले यांचे चरित्र संशोधक व अभ्यासक हरी नरके यांचे मुंबईत बुधवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर तिथे औषधोपचार सुरू होते. पुरोगामी चळवळींना वैचारिक आधार देण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता. समाजमाध्यमांवरही ते ब्लॉगर म्हणून प्रसिद्ध होते. परखड व साधार मते ते व्यक्त करत असत.

त्यांच्या पश्चात पत्नी संगीता, मुलगी प्रमिती हा परिवार आहे. मागील काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्याची माहिती त्यांनी मित्रपरिवाराला दिली नाही. औषधोपचार सुरू आहेत, असेच ते सांगत होते. समाजमाध्यमांवर त्यांच्या पोस्ट येत असत. मात्र, त्यातही कोणी आजाराबाबत काही विचारले, काळजी व्यक्त केली, तर ते फक्त लवकरच बरे वाटेल, असेच सांगत असत, प्रचलित राजकारण, समाजकारण यावर ते मागील आठ दिवसांपर्यंत पोस्ट करत होते.

पुण्यातून ते एका कार्यक्रमासाठी म्हणून मुंबईला गेले होते. तिथे त्यांना सकाळी त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने एका रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र, तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

विविध मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली-

महात्मा फुले यांचे विचार आणि साहित्याचा अभ्यास आणि संशोधन हाच जीवनाचा ध्यास घेतलेल्या हरी नरके यांचे आकस्मिक जाणे वेदनादायक आहे. हिंदुत्वाचा आक्रमक प्रचार होत असतानाच्या काळात समानव्ययवादी भूमिका घेणारा हरी असायला हवा होता. शेतमजूर कुटुंबातील धडपडणारा मुलगा असलेल्या हरीने आपल्या कर्तृत्वावर शिक्षण पूर्ण केले. हडपसर येथे माझ्या दवाखान्यात हरी नेहमी येत असे. महात्मा फुले, सत्यशोधक चळवळ, लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्तांची चळवळ, मंडल आयोगाची अंमलबजावणी या सर्व चळवळीत हरीचा सहभाग होता. राज्य शासनाच्या समितीवर काम करून त्याने महात्मा फुले साहित्य प्रकाशनाला गती दिली. छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील समता परिषदेचा हरी मार्गदर्शक होता.

-डॉ. बाबा आढाव, ज्येष्ठ कामगार नेते

सामाजिक क्षेत्रात बाळ गांगल यांनी महात्मा फुले यांच्याविरोधात लेख लिहिला होता. वयाच्या बाविसाव्या वर्षी त्याला प्रतिवाद करणारे पुस्तक प्रा. हरी नरके यांनी लिहिले. त्या काळातल्या दिग्गज लोकांनी त्यांना जवळ घेतले. अत्यंत गरीब परिस्थितीमधून ते वर आले. स्मशानभूमीत रखवालदाराचे काम ते करायचे. इतकी त्यांची बिकट स्थिती होती. महात्मा फुलेंची जन्मतारीख शोधणे, फुलेवाड्याची बांधणी होणे, संसद भवनात महात्मा फुलेंचा पुतळा आरूढ होणे, या सर्व गोष्टींमध्ये त्यांचा पुढाकार होता. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे ते विचारवंत नव्हते, तर कृतिशील कार्यकर्ते होते. त्यांचं काम महाराष्ट्रापर्यंत केवळ मर्यादित नव्हते, तर शाहू, फुले, आंबेडकर यांच्याविषयी त्यांनी तिथे जाऊन व्याख्याने दिली आहेत. फुलेवाद नवीन पिढीपर्यंत पोहोचण्याचे श्रेय एकमेव हरी नरके यांनाच जाते अन्यथा सांस्कृतिक वातावरणात महात्मा फुले दुर्लक्षितच राहिले असते. असा सांस्कृतिक आधारवड हरपला आहे. वयाच्या केवळ साठाव्या वर्षी जाणे हे वेदनादायी आहे. हे न भरून येणारे नुकसान आहे. भविष्यात असे विचारवंत निर्माण होणे, हे दुरापास्त आहे. पुरोगामी विचारविश्वाचे भवितव्य काय? हा प्रश्न आहे.

- संजय सोनावणी, प्रसिद्ध साहित्यिक

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने मी माझा जवळचा मित्र गमावलेला आहे. महाराष्ट्राच्या वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली. प्रा. नरके यांचे योगदान हे खूप मोठे आहे. त्यांच्यावर महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा होता आणि त्यांनी या महापुरुषांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. मराठी ही अभिजात दर्जासाठी कशी पात्र आहे, याचा अभ्यास आणि संशोधन करून ते त्यांनी सिद्धही केले. मराठीच्या अभिजात दर्जासाठी ते लढले. मराठी भाषेसाठी त्यांचे काम मोठे होते. महाराष्ट्राला वक्त्यांची परंपरा आहे, त्या परंपरेतील प्रा. नरके आघाडीचे वक्ते होते. महाराष्ट्राने एक पुरोगामी विचारवंत गमावला.

- लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष

प्रा. हरी नरके आणि माझा २५ वर्षांपासूनचा परिचय होता. काही विषयांवर आमचे मतभेद होते. पण ते कधी मैत्रीच्या आड आले नाहीत. मुख्यत: फुले, शाहू, आंबेडकर यांचे साहित्य शासनाने प्रसिद्ध करावे, अशी त्यांची मागणी होती. विशेषतः ‘स्पीचेस ॲण्ड हॅण्डरायटिंग ऑफ बाबासाहेब आंबेडकर’ यामध्ये त्यांचा खूप मोठा पुढाकार होता. ते नसते तर शासनदरबारी हे पुस्तक झालेच नसते. महात्मा फुले यांचे आयुष्य आणि त्यांच्या साहित्यावर नरके यांचा समग्र अभ्यास होता. त्याविषयीचे काही संदर्भ लागले, तर सर्वजण त्यांच्याकडे धाव घ्यायचे.

- विश्वंभर चौधरी, विचारवंत

अभ्यासू विचारवंत

हरी नरके यांनी स्वत: ची प्रतिमा अभ्यास व संशोधन यातून अगदी अल्पावधीत पण प्रचंड परिश्रमपूर्वक तयार केली. विचारवंत व बुद्धिवंतांमध्ये इतक्या कमी वयात नाव करणे फार अवघड असते. मात्र, प्रत्येक गोष्ट पुराव्यासह बोलायची, परखड बोलायची ही सवय त्यांनी लावून घेतली. विद्यार्थीदशेपासून त्यांचा माझा परिचय होता. स्त्री आधार केंद्रांच्या कामात शालेय वयातच हरी नरके सहभागी झाले हाेते. त्यांच्या आजाराबाबत त्यांनी काहीही कळवले नाही किंवा मलाही कळाले नाही, ही खंत आता कायम राहील.

-डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

‘य. दि. फडकेंच्या ग्रंथलेखनाचा वसा अर्धवटच राहिला...’

‘माझ्या संशोधनाची वहिवाट तुम्ही पुढे सुरू ठेवाल,’ अशी आशा डॉ. य. दि. फडके यांनी हरी नरके यांच्याबाबत व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर फडके सरांच्या ग्रंथ लेखनाचा वसा घेऊन हरी ग्रंथ लेखन करेल, असे वाटले होते. पण ते झाले नाही. महात्मा फुले यांचे चरित्र त्याने नवे संशोधनाच्या आधारे लिहावे, अशी माझी कल्पना होती. राजहंस प्रकाशनने त्याला मान्यताही दिली होती. मात्र, तेही आता होणार नाही. अशा अनेक गोष्टी आता कायमच्या अपुऱ्या राहणार आहेत.

-अरुण खोरे, ज्येष्ठ पत्रकार

स्पष्ट व परखड

हरी यांचा स्पष्ट व परखड बोलण्याचा, तेही व्यवस्थित संदर्भ देत स्वभाव मला आवडायचा. त्यांचा माझा परिचय ४० वर्षांचा. आमच्या चळवळीला त्यांच्या अभ्यासाचा फार उपयोग झाला. माझे ते अगदी जवळचे मित्र होते. पुरोगामी विचार व तसाच आचार हे त्यांचे वैशिष्ट्य होते. भाषणांचे त्यांना वेडच होते. लेखनासाठीही त्यांनी वेळ द्यायला हवा होता, असे मला वाटते.

-जयदेव गायकवाड- माजी आमदार.

Web Title: Senior thinker Prof. Tribute to Hari Narke by dignitaries from literary and social fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.