सिंदोळा मोजतोय अखेरचा श्वास

By Admin | Published: May 7, 2017 01:43 AM2017-05-07T01:43:02+5:302017-05-07T01:43:02+5:30

जुन्नर तालुका हा किल्ले, लेण्या आणि नैसर्गिक विविधतेने समृद्ध आहे. शिवनेरी, चावंड, हडसर, निमगिरी, नारायणगड, जीवधन

Sense of measuring the last breath | सिंदोळा मोजतोय अखेरचा श्वास

सिंदोळा मोजतोय अखेरचा श्वास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा किल्ले, लेण्या आणि नैसर्गिक विविधतेने समृद्ध आहे. शिवनेरी, चावंड, हडसर, निमगिरी, नारायणगड, जीवधन आणि सिंदोळा हे ७ किल्ले जुन्नर तालुक्यात आहेत.
अहमदनगर-कल्याण मार्गावर मढ गावाच्या पश्चिमेला ४ किलोमीटर अंतरावर खुबी फाटा आहे. खुबी फाट्याच्या नैर्ऋत्येला सिंदोळा किल्ला आहे. सिंदोळा किल्ल्याच्या माथ्यापासून पूर्वेकडे एक डोंगरधार गेलेली आहे. या डोंगरधारेमध्ये एक खिंड दिसते. या खिंडीमधून गडावर जाणारा मार्ग आहे. समोरच्या सिंदोळ्या दिशेने चढाई केल्यावर आपण माथ्याच्या खाली येऊन पोहोचतो. वाटेमध्ये तुटलेल्या पायऱ्या आहेत. गडाचे दरवाजाचे व अवशेष आणि तटबंदीचे काही अवशेष ढासळलेल्या अवस्थेत दिसतात. शासनाच्या उदासीन धोरणामुळे किल्ले सिंदोळा आजही मरणासन्न अवस्थेत जगताना पाहावयास मिळतोे.
गडाच्या माथ्यावर पाण्याची काही टाकी आहेत. पाणी बारा महिने टिकत नाही. एक मंदिर आहे. एका खडकातील खड्ड्यामधे अनेक त्रिशूळ उभे केलेले दिसतात. गडाच्या माथ्यावरून हडसर, चावंड, शिवनेरी तसेच माळशेज घाट आणि इतर परिसर खूप सुंदर दिसतो. उंचउंच सह्याद्रीच्या कड्यांनी वेढलेला हा परिसर अक्षरश: पर्यटकांना पाहता क्षणी वेड लावतो. विविध पक्षी, वनस्पती, प्राणी, कीटक या परिसरात अभ्यासायला मिळतात.
मात्र, काळाच्या ओघात या सिंदोळा किल्ल्यावर अनेक ठिकाणी पडझड झाली असून, गडकोटाचे अनेक भाग भग्नावस्थेत असून ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गडावर जाणारे मार्ग नैसर्गिक आपत्तीत सापडून जमीनदोस्त झाले. पायरी मार्ग गाडले गेले. संरक्षक भिंतीचे ठिकठिकाणी फक्त सांगाडेच सापळे शिल्लक राहिले आहेत. पाण्याच्या टाक्या गाडल्या गेल्या आहेत. कातळात वर मुख्य दरवाजापाशी पश्चिममुखी अष्टभुज गणपती कातळात आजही या किल्ल्याची ओळख देत उभा आहे. गडावर जुन्या इतिहास शिल्पांची ओळख देणारी शिवपिंड आहे. या गडाचे संवर्धन होणे गरजेचे आहे. गाडलेले पायरीमार्ग, पाण्याच्या टाक्यांचे संवर्धन करून या गडाला गडपण देण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. शासनाने वेळीच या गडकोट किल्ल्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन संवर्धनाचे काम सुरू केले नाही, तर हे सर्व किल्ले एक दिवस फक्त डोंगर म्हणूनच शिल्लक राहतील, यात शंकाच नाही.

Web Title: Sense of measuring the last breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.