अनगड मुलांच्या मोबाईलला ‘तसल्या’ साइटचा नाद
By admin | Published: June 27, 2015 03:42 AM2015-06-27T03:42:22+5:302015-06-27T03:42:22+5:30
अडनिड्या वयातली पोरं एकत्र आली की नुसता धुमाकूळ...पण सध्या या वयातली पोरं एकत्र येऊन चिडीचूप मोबाईलला चिकटलेली असतात. ऊठसूट
पुणे : अडनिड्या वयातली पोरं एकत्र आली की नुसता धुमाकूळ...पण सध्या या वयातली पोरं एकत्र येऊन चिडीचूप मोबाईलला चिकटलेली असतात. ऊठसूट मोबाईल हवाच. त्यांनी वापरलेले मोबाईल काही दिवसांतच
हँग होतात? ही काय भानगड...व्हायरस अॅटॅक होतात- ती फक्त मोबाईलवर की मुलांच्या मनावरही? ऊठ-बस
मोबाईल हवेतच कशाला? याचे
उत्तर शोधत सध्या पालक
समुपदेशकांकडे धाव घेत आहेत. मुलांच्या अनगड जगात सध्या ‘तसल्या’ साइट पाहण्याचे खुळ वाढत आहे. शाळेतील मुलांमध्ये पॉर्न साइट पाहण्याचे प्रमाण वाढलेले असून, वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मुले अशा प्रकारच्या साइटच्या आहारी जात असल्याचे ‘चाईल्ड लाइन’च्या पाहणीतून पुढे आले आहे.
वयात आल्यानंतर आकर्षण वाटणे, शारीरिक बदल घडणे, या गोष्टी नैैसर्गिक आहेत; मात्र आता शालेय मुलांमध्ये पॉर्न साइट पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल हातात आल्याने ही सोयही सहजी उपलब्ध झाली आहे. त्यातून निरनिराळे व्हिडीओ क्लिप्स, मित्रमंडळींकडून थेट शेअर होणारे पॉर्न साइट सर्फिंगचे आमंत्रण, वाढत्या वयात अपेक्षित प्रश्नांची उत्तरे न मिळणे, मोठ्या मुलांच्या संगतीतील अर्धवट काहीतरी कळणे आणि त्यातून उत्सुकता चाळवण्याने अशा साइटकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वेळा मोठ्या भावंडांच्या मोबाईलमध्ये चोरून पाहिलेल्या क्लिप्स, अशा कारणांनी या व्यसनाच्या विळख्यात मुले अडकत असल्याचे पाहणीत उघड झाले आहे.
ज्ञानदेवी संचलित चाईल्ड लाइनच्या प्रमुख अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘‘अनेकदा मुले काहीतरी कामाच्या शोधात असताना, त्यांना अशा प्रकारच्या साइटची ओळख होते. हळूहळू ते याच्या आहारी जातात. दहाव्या वर्षापासून मुले या साइट पाहत असल्याचे पुण्यात निरनिराळ्या शाळेत ज्ञानदेवी संस्थेच्या मार्गदर्शनातून उभ्या असलेल्या बालसेनांकडून वेळोवेळी कळते. ते वय अडनिडे असल्याने यासाठी पालकांनीही गांभीर्याने लक्ष देणे
आवश्यक आहे.’’