वीजबचतीसाठी स्वच्छतागृहात सेन्सर
By admin | Published: April 30, 2017 05:13 AM2017-04-30T05:13:54+5:302017-04-30T05:13:54+5:30
महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील सर्व स्वच्छतागृहांमध्ये सेन्सर बसवण्यात आले आहेत. यापुढे आत कोणी व्यक्ती असेल तरच आतील दिवे लागतील, अन्यथा ते
पुणे : महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील सर्व स्वच्छतागृहांमध्ये सेन्सर बसवण्यात आले आहेत. यापुढे आत कोणी व्यक्ती असेल तरच आतील दिवे लागतील, अन्यथा ते आपोआप बंद होतील. यातून महापालिकेची सुमारे २० टक्के वीज बचत होणार आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागाने हे सेन्सर सध्या प्रायोगिक तत्त्वावर बसवले आहेत. महापालिका मुख्य व विस्तारित इमारतीच्या तळमजल्यापासून सर्व मजल्यांवर स्त्री व पुरुषांसाठी अशी सुमारे २० स्वच्छतागृहे आहेत. त्यातील दिवे आत कोणीही नसले तरीसुद्धा सुरूच राहतात, अनेकदा दिवे बंद करायचे विसरले जाऊन ते रात्रभर सुरूच राहतात, असे विद्युत विभागाच्या पाहणीत आढळले. त्यामुळे महापालिकेच्या वीजबिलात बरीच वाढ होते, असेही निदर्शनास आले.
त्यावर उपाय म्हणून विद्युत विभागाने हे सेन्सर बसवले आहेत. आतील बाजूस ह्यूमन बॉडी असेल तरच दिवे सुरू राहतील. स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडला की, बंद असलेले आतील दिवे लागतील. जोपर्यंत स्वच्छतागृहात आत कोणीतरी आहे, तोपर्यंत ते सुरू राहतील. आत कोणीच नसेल, अशा वेळी सर्व दिवे आपोआप बंद होतील. यातून वीज बचतीस मदत होणार आहे.
(प्रतिनिधी)
प्रायोगिक प्रकल्प
सध्या प्रायोगिक स्तरावर महापालिकेनेच हे सेन्सर बसवले आहेत, अशी माहिती विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता श्रीकृष्ण चौधरी यांनी दिली. त्याचा चांगला परिणाम दिसत आहे.
त्यामुळे आता महापालिकेच्या मालकीच्या शहरातील सर्वच इमारतींमधील स्वच्छतागृहांत असे सेन्सर बसवण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यामुळे महापालिकेची सुमारे
२० टक्के वीजबचत होईल, असेही ते म्हणाले.