कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत जड वाहनांसाठी स्वतंत्र लेन; चंद्रकांत पाटील यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 06:42 PM2022-11-25T18:42:02+5:302022-11-25T18:42:13+5:30
भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना अमंलात आणण्यासाठी सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले
पुणे: “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योजलेल्या उपायांमुळे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत नवले पुलाजवळ यंदा अपघात कमी झाले आहे. मात्र, रविवारी झालेला अपघात भीषण होता. त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना अमंलात आणण्यासाठी सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात त्यांचा अहवाल येईल. मात्र, त्यापूर्वी कात्रज बोगदा ते नवले पूल या सात किलोमीटरच्या परिसरात जड वाहनांसाठी उजव्या बाजुला स्वतंत्र लेन करण्यात येईल,” अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
नवले पुलाच्या अपघातानंतर पाटील यांनी सर्व संबंधितांची शुक्रवारी बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “नवले पुलावर रविवारी झालेला अपघात हा नऊ महिन्यांनंतरचा मोठा अपघात आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा अपघातांत मोठी घट झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योजलेल्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण घटले आहे. मात्र, यापुढे अपघात होऊ नयेत यासाठी आणखी उपाययोजना योजण्यात येतील. त्यासाठी सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेला अभ्यास करण्याचे करण्याचे सांगितले आहे. त्यांचा अहवाल आठवडाभरात येईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. आजच्या बैठकीत त्यांनी कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या सात किलोमीटरच्या पट्ट्यात जड वाहनांसाठी उजव्या बाजुला स्वतंत्र लेन करावी. कारण काही अंतरानंतर डाव्या बाजुने शहरातील वाहतूक या महामार्गावर येते. त्यामुळे हा उपाय त्यांनी सुचविला आहे. तसेच बोगद्याच्या सुुरवातीला एक चेकपोस्ट तयार करण्याचे ठरले आहे. त्यात २४ तास पोलिसांची उपस्थिती राहील. तेथे चालकांना सुचना देण्यात येतील. या सात किलोमीटरच्या पट्ट्यात विविध भागांतील सुचना फलकही लावण्यात येतील. काही ठिकाणी चालकांना सुचना देण्यासाठी उद्घोषणा बुथ उभारण्यात येणार आहेत. वेगाला अडथळा आणण्यासाठी जास्त उंचीचे रम्बलर स्ट्रीप ठराविक अंतरात टाकण्यात येतील. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी स्कायवॉकही उभारण्यात येतील.”
अपघात कमी होण्याची आशा
नवले पुलावर जास्त उतार असल्याने अपघात होत आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर हा उतार योग्य असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या दोघांमध्ये मतभेद आहेत. मात्र, नवले पूल पाडणे हा त्यावरचा उपाय नाही, असे स्पष्ट करत पाटील यांनी सेव्ह लाईफ संस्थेकडून आलेल्या उपायांमुळे अपघात कमी होतील अशी आशा व्यक्त केली.