वेगळी महापालिका ‘भाजप’च्या पथ्यावर पडणार
By Admin | Published: April 10, 2015 05:40 AM2015-04-10T05:40:37+5:302015-04-10T05:40:37+5:30
नवीन ३४ गावांचा समावेश करताना उत्तर-पूर्व भागासाठी वेगळी महापालिका केल्यास पुणे महापालिकेतील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत.
हणमंत पाटील, पुणे
नवीन ३४ गावांचा समावेश करताना उत्तर-पूर्व भागासाठी वेगळी महापालिका केल्यास पुणे महापालिकेतील सत्तेची समीकरणे बदलणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला धक्का देत सत्तेवर येण्याचे आडाखे भाजपच्या नेत्यांकडून आखले जात आहेत.
पुणे महापालिकेच्या हद्दीत ३४ गावांचा समावेश करताना वेगळी महापालिका करण्यासाठी आवश्यक निकषांची तपासणी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकतीच केली. त्या अगोदरपासून येरवडा, वडगावशेरी, मुंढवा, हडपसर व कोंढवा या पूर्व भागासाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी सुरू आहे. त्यासाठी भाजपचे स्थानिक आमदार योगेश टिळेकर व जगदीश मुळीक आग्रही आहेत.
सद्यस्थितीमध्ये पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभागांत भाजप, शिवसेना व मनसेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, महापालिकेच्या चारही दिशेच्या उपनगरांत राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्राबल्य आहे. पूर्व व उत्तर भागात मिळून स्वतंत्र महापालिका झाल्यास पुणे महापालिकेचे साधारण एक तृतीयांश नगरसेवक कमी होणार आहेत. त्यामध्ये ७५ टक्के नगरसेवक राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे आहेत. त्यामुळे महापालिका वेगळी झाल्यास काँग्रेस आघाडीला धक्का बसणार आहे. शहरात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला शतप्रतिशत सत्ता मिळाली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वेगळी महापालिका होणे भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. त्यादृष्टीने भाजपच्या नेत्यांकडून आडाखे व मनसुबे आखले जात आहेत. त्यादृष्टीने काही राजकीय मंडळींनी सर्वेक्षण सुरू केले आहे. मात्र, त्याविषयी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते अद्याप अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.