‘वायसीएम’मध्ये व्हिसेरासाठी पोलिसांना स्वतंत्र जागा
By Admin | Published: May 19, 2017 04:24 AM2017-05-19T04:24:48+5:302017-05-19T04:24:48+5:30
येथील वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील अनोळखी मृतदेह आणि अवयवांच्या नमुने (व्हिसेरा) ठेवण्यासाठी पोलिसांना स्वतंत्र खोली देण्यात आली आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : येथील वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील अनोळखी मृतदेह आणि अवयवांच्या नमुने (व्हिसेरा) ठेवण्यासाठी पोलिसांना स्वतंत्र खोली देण्यात आली आहे. त्या खोलीचा ताबा पोलिसांकडे देण्यात आल्याने तुर्तास वायसीएम रुग्णालयात मृतदेहाचे व्हिसेरा ठेवायचे कोठे हा प्रश्न होता. याबाबत वायसीएम प्रशासनाने पिंपरी महापालिकेच्या स्थापत्य विभागाशी चर्चा केली असून त्यानुसार येत्या दीड महिन्यात त्यावर तोडगा काढणार असल्याची माहिती वायसीएम रुग्णालयाचे प्रमुख डॉ. अनिल रॉय यांनी दिली.
एखाद्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्यास त्याचा उत्तरीय तपासणीनंतर ‘व्हिसेरा’ (मृत व्यक्तीच्या अवयवाचा भाग) राखून ठेवला जातो. संशयास्पद मृत्यू असेल तर मृत्यू नेमका कशाने झाला, हे मृत्यूचे कारण स्पष्ट होण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात येतो. व्हिसेरा पोलिसांनी आपल्या ताब्यात घेऊन तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणे गरजेचे असते. मृत्यूचे कारण स्पष्ट होऊन न्यायालयीन प्रक्रियेत तपासकामी मदत होते. परंतु वायसीएम रुग्णालयात व्हिसेरा अनेक दिवसांपासून पडून असून ते पोलिसांनी अद्याप नेले नाही.
बहुतांश व्हिसेरा हे ग्रामीण भागातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. पूर्वी हे व्हिसेरा वायसीएम रुग्णालयातील तातडी विभागाजवळ ठेवण्यात आले होते. बऱ्याच दिवसांपासूनचे व्हिसेरा असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाइकांना सहन करावा लागत होता. पोलिसांनी स्वतंत्र खोलीची मागणी रुग्णालयास केली होती.
रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होणार दूर
वैद्यकीय अधीक्षकांच्या सूचनेनुसार शवविच्छेदन विभागातील खोली पोलिसांना व्हिसेरा ठेवण्यासाठी देण्यात आली. ही जागा केवळ ‘व्हिसेरा’ ठेवण्यासाठी दिल्याने शवविच्छेदनासाठी आलेला कुजलेला मृतदेह ठेवण्यास जागा नाही. गैरसोय होऊ लागल्याने डॉक्टर आणि पोलीस तक्रारीचे प्रकार घडू लागले आहेत. त्यात पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात नद्यांमध्ये कुजलेले मृतदेह आढळतात. शवविच्छेदनानंतर हे मृतदेह ठेवण्यास रुग्णालयाकडे जागा नाही. मृतदेह घेऊन जाण्यास पोलिसांकडून टाळाटाळ होते.