भिन्नलिंगींसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृह
By admin | Published: December 2, 2014 11:44 PM2014-12-02T23:44:56+5:302014-12-02T23:44:56+5:30
देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये आता यापुढे भिन्नलिंगीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) विचार सुरू
पुणे : देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये आता यापुढे भिन्नलिंगीयांसाठीही स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) विचार सुरू असून, त्याबाबत लवकरच सर्व विद्यापीठे, महाविद्यालये व संस्थांना निर्देश दिले जाणार आहेत. या संस्थांमध्ये भिन्नलिंगींची होणारी कुचंबणा टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘अस्तित्व’ या संस्थेच्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ‘लोकमत’ला दिली.
सर्वोच्च न्यायालयाने पुरुष व महिलांप्रमाणेच भिन्नलिंगींनाही अधिकृत दर्जा देत ओळख मिळवून दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी नारायण त्रिपाठी या सर्व शासकीय कार्यलये, शैक्षणिक संस्थांमध्ये भिन्नलिंगींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये भिन्नलिंगींना स्वच्छतागृहाचा वापर करताना कुचंबणा सहन करावी लागते. त्यांचा लैंगिक छळ होतो. त्यांच्यावर रॅगिंग केले जाते. विविध शिष्यवृत्त्यांमध्ये त्यांना स्थान मिळत नाही. एकूणच शैक्षणिक प्रवाहात हा समाजघटक दुर्लक्षित राहिला आहे, हे लक्षात घेऊन त्रिपाठी यांनी ‘यूजीसी’कडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना त्रिपाठी म्हणाल्या, की भिन्नलिंगींसाठी यूजीसीने आपल्या धोरणांमध्ये विविध बदल केले आहेत. आणखी काही बदल अपेक्षित आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये भिन्नलिंगींना स्वतंत्र स्वच्छतागृह असण्याबाबत यूजीसीने निर्णय घेतला आहे. त्याबाबत लवकरच सर्व संस्थांना कळविले जाणार आहे. त्याचबरोबर भिन्नलिंगींवर रॅगिंगही होते. त्याबाबत कायद्यात तरतूद, संशोधन शिष्यवृत्ती यांसह शिक्षणामध्ये इतरांप्रमाणे त्यांना सर्व प्रकारचे अधिकार मिळावेत यासाठी यूजीसीकडे पाठपुरावा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यूजीसीला हे निर्णय घ्यावे लागतील. (प्रतिनिधी)