सह्याद्री रेल्वे नावाने स्वतंत्र झोन व्हावा, रेल्वे यात्री संघाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 01:00 AM2018-08-18T01:00:57+5:302018-08-18T01:01:24+5:30
मुंबईतील एकूणच रहदारी पाहता आणि प्रवासी संख्या प्रचंड असल्याने योग्य तो न्याय निधीरूपाने मुंबई रेल्वे विभागाला मिळत नाही.
पुणे - मुंबईतील एकूणच रहदारी पाहता आणि प्रवासी संख्या प्रचंड असल्याने योग्य तो न्याय निधीरूपाने मुंबई रेल्वे विभागाला मिळत नाही. त्यामुळे तेथील अनेक प्रकल्प अर्धवट आहेत. मुंबईकरिता वेगळा तसेच उर्वरित राज्यासाठी सह्याद्री रेल्वे (एसएचआर) नावाने स्वतंत्र झोन करण्यात यावा, अशी मागणी रेल यात्री संघाच्या वतीने करण्यात आली. संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी ही माहिती दिली.
नांदेड, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ आणि कोकण विभाग एसएचआरमध्ये समाविष्ट केल्यास रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील असे संघाने म्हटले आहे. अद्यापदेखील इंग्रजांच्या कार्यपद्धतीनुसारच रेल्वेचे कामकाज सुरू असून त्यात कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे. या धर्तीवर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्यालय पुण्यात स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. राज्यातील अनेक नवीन रेल्वे मार्गांना मंजुरी मिळाली असून, त्यांच्या सर्वेक्षणाचे काम संथगतीने सुरु आहे. अनेक मार्गावरील भूसंपादन होणे बाकी आहे. आर्थिक तरतूद असूनदेखील लातूर रोड, अहमदपूर, लोहा, नांदेड रेल्वे मार्गाचे काम संथ गतीने सुरु आहे. तसेच उदगीर बोधन, लातूर, गुलबर्गा, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, जळगाव, जालना आदी मार्गांचे कामे देखील बंद स्थितीत आहे. याशिवाय अनेक लुपलाईन मंजूर असतानादेखील त्यांचे काम होत नाही. याविषयी चौकशीची मागणीदेखील संघाने केली आहे.
पुणे-नाशिक मार्ग, पुणे-लोणावळा तिसरी व चौथी मार्गिका, पुणे-नाशिक व पुणे-दौंड मार्गावर लोकल सेवा, पुणे-नगर
मार्गाचे विस्तारीकरण आणि अहमदनगर-पुणे इंटरसिटीची जोरदार मागणी असून दौंड ते अहमदनगर कॉर्ड लाईनचे कामे रेंगाळली आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी देखील लोकलची सेवा सुरू नाही.