भेकराच्या पिलांची आईपासून ताटातूट; शेतकर्याने दिले जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:26 PM2017-10-10T14:26:13+5:302017-10-10T14:36:20+5:30
जन्मदात्या आईची जंगलातून जेथून ताटातूट झाली तेथे त्या भेकराच्या पिलांना दिवसभर ठेवून देखरेख केली. मात्र त्यांची आई आली नाही. अखेर ती कोणाची भक्ष्य ठरू नयेत, म्हणून त्यांना संगोपनासाठी कात्रज प्राणिसंग्रालयात दाखल करण्यात आले.
वेल्हे : जन्मदात्या आईची जंगलातून जेथून ताटातूट झाली तेथे त्या भेकराच्या पिलांना दिवसभर ठेवून देखरेख केली. मात्र त्यांची आई आली नाही. अखेर ती कोणाची भक्ष्य ठरू नयेत, म्हणून त्यांना संगोपनासाठी कात्रज प्राणिसंग्रालयात दाखल करण्यात आले.
वेल्हे तालुका हा अतिदुर्गम असून जैवविविधता व विविध वन्यजीवांनी समृद्ध असा हा परिसर आहे. सह्याद्रीच्या अतिदुर्गम पर्वतरांगेतील जंगलामध्ये भेकर नावाचा प्राणी आढळतो. कोंढावळे बुद्रुक येथील शेतकरी विजय थोपटे शेतामध्ये मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता भेकर जातीच्या प्राण्याची दोन पिले त्यांना मेंढ्यांच्या कळपात दिसली आणि त्यांना आश्चर्य वाटले. मात्र ती भाबडी पिलं दिवसभर त्या मेंढ्यांच्या कळपात चरत राहिली, मात्र त्यांची आई काही आली नाही. लळा लागल्याने कळपासोबत ती थोपटे यांच्या घरीदेखील आली.
यामधील एका भेकराची प्रकृती खालावल्याचे जाणवल्याने संध्याकाळी घरी येताच थोपटे यांनी हा प्रकार वनविभागाचे कर्मचारी बी. व्ही. तांबे यांना कळविला. वनविभागाचे वनरक्षक तांबे, गोकुळ बंगाल आणि जी. पी. बागडे यांनी प्रथमोपचार केले. जन्मदात्या आईची भेट घडवून देण्यासाठी त्या पिलांना घेऊन जेथून पिले कळपात सहभागी झाली त्या ठिकाणी ठेवले. रात्री उशिरापर्यंत पडत्या पावसात ते कर्मचारी व विजय थोपटे देखरेख करीत थांबले. या पिलांना त्यांची आई व नैसर्गिक जीवन मिळावे, या हेतूने त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांची आई तेथे आली नाही. अखेर त्या पिलांना कात्रज प्राणिसंग्रहालयात देण्यात आले.
भेकराची पिले कळपासोबत दिवसभर फिरली. मी त्यांच्यावर लक्ष ठेवले. दुर्लक्ष केले असते तर कुत्री, मांजर यांच्याकडून त्याच्या जीवितास धोका होता. शिवाय मानवी वस्तीजवळ आल्याने आयती शिकार होऊन निष्पाप पिलांचा नाहक बळी गेला असता.
- विजय थोपटे,
शेतकरी, कोंढावळे बुद्रुक, ता. वेल्हे.
वेल्हे तालुक्यात जंगलामधून विविध प्रजातींचे प्राणी, पक्षी, वनस्पती अस्तित्वात आहेत. या प्रजातींचे संवर्धन करणे ही माणसाची जबाबदारी आहे. भेकर प्राणी आढळल्यास त्यांची शिकार न करता वनविभागास कळवावे व प्राण्यांना जीवदान द्यावे.
- बी. व्ही. तांबे,
वनरक्षक वेल्हे तालुका.