धोकादायक वळणांवरील अपघातांची मालिका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:10 AM2021-01-15T04:10:29+5:302021-01-15T04:10:29+5:30
धोकादायक लोकमत न्यूज नेटवर्क शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर असलेल्या दोन्ही धोकादायक वळणांवरील अपघातांची मालिका सुरूच आहे. विशेष म्हणजे गॅसचे ...
धोकादायक
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : चाकण-शिक्रापूर राज्यमार्गावर असलेल्या दोन्ही धोकादायक वळणांवरील अपघातांची मालिका सुरूच आहे. विशेष म्हणजे गॅसचे भरलेले टँकर व अवजड वाहने वाहतुकीदरम्यान पलटी होण्याच्या घटना वाढत आहेत. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाय योजना करणे काळाची गरज आहे.
चाकण-शिक्रापूर हा मार्ग पुणे जिल्ह्यातील तीन ते चार महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींना जोडणारा रस्ता आहे. त्यामुळे तो नेहमीच वाहनांच्या गर्दीने फुललेला असतो. परराज्यातून वसाहतींना कच्चा माल पुरविणारे असंख्य अवजड कंटेनर याच मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करत आहेत. साबळेवाडी तसेच शेलपिंपळगावच्या पश्चिमेला 'एस' पद्धतीची धोकादायक वळणे आहेत. दोन्हीही वळणे अत्यंत धोकादायक असून नित्याने मोठमोठे अपघात वळणांवर सातत्याने घडत आहेत. गॅसचे टॅकर, ट्रक, मालवाहू गाड्या, दुधाचे ट्रक वळण घेत असताना सातत्याने पलटी होत आहेत.
शेलपिंपळगावच्या वळणावर बुधवारी (दि.१३) गॅसने भरलेला टँकर पलटी झाला. सुदैवाने गॅसगळती झाली नाही. मात्र बराच काळ परिसरात भीतीजन्य वातावरण पसरले होते. रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. अग्निशमन दल पाचारण करून उलटलेला टँकर क्रेनच्या साह्याने पूर्ण बंदोबस्तात सरळ करण्यात आला. एकंदरीतच रस्त्यावरील दोन्ही ठिकाणच्या वळणांवर वाढते अपघात स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. नित्याचे होणारे अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठोस उपाय योजण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ व वाहतूकदारांकडून केली जात आहे.
चौकट : महामार्गावरील दोन्ही धोकादायक वळणांवर सातत्याने मोठमोठे अपघात होत आहेत. परिणामी जीवितहानीचा आकडा वाढत चालला आहे. शेलपिंपळगावच्या वळणावर गेल्या वर्षभरात पंधरा ते वीस, तर साबळेवाडीच्या वळणावर वीस ते पंचवीस वाहने वाहतुकीदरम्यान पलटी झाली आहेत. दुचाकींच्या अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे
.
फोटो ओळ : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील धोकादायक वळणावर पलटी झालेला गॅसचा टॅकर क्रेनच्या साह्याने सरळ करताना. (छाया : भानुदास पऱ्हाड)