‘लसीकरणाच्या वशिलेबाजीची प्रशासनाकडून गंभीर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:58+5:302021-08-26T04:12:58+5:30
डोर्लेवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकतील लसीकरणाच्या वशिलेबाजीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच बारामती पंचायत समिती तसेच डोर्लेवाडी ग्रामपंचायतीने ...
डोर्लेवाडी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकतील लसीकरणाच्या वशिलेबाजीचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच बारामती पंचायत समिती तसेच डोर्लेवाडी ग्रामपंचायतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायतीने देखील वारंवार पंचायत समितीमध्ये ग्रामसभेचे ठराव व निवेदने देण्यात आली आहेत. तसेच पुन्हा एकदा या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देणार असल्याचे सरपंच पांडुरंग सलवदे यांनी सांगितले.
डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पात्र लाभार्थ्यांना लस मिळविताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या ठिकाणी वशिला असणाऱ्यांनाच लस मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर ‘लोकमत’मध्ये २३ ऑगस्ट रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली देवकाते यांनी संबंधित पत्रकाराला अरेरावी भाषा वापरत शिवीगाळ केली. या प्रकाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच पत्रकार संघटनांना देखील या प्रकरणानंतर आक्रमक झाल्या आहेत. या वृत्तानंतर डोर्लेवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिऱ्यांना या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा पाढाच वाचला.
अनेकवेळा याबाबत पंचायत समितीला निवेदन दिले गेले आहे. अगदी ग्रामसभेने या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बदलीबाबत केलेले ठरावांची देखील पंचायत समितीने दखल घेतली नाही. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील याबाबत काही महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते. संबंधित वैद्यकिय अधिकाऱ्याची शासकीय नियमानुसार तातडीने बदली करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे.
ग्रामस्थांच्या तक्रारीची पंचायत समितीच्या आरोग्य विभागाकडून योग्य ती दखल घेण्यात येईल. तसेच सबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला समज देण्यात येईल.
- डॉ. मनोज खोमणे
तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती बारामती
प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी यांचेबाबत रुग्णांच्या अनेक तक्रारी आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांना व पदाधिकाऱ्यांना योग्य वागणूक देत नाहीत. कोरोना लसीकरणाबाबत अनेक तक्रारी आहेत. गाव पातळीवर नागरिकांना प्राधान्य न देता बाहेरील गावातील नागरिकांना बेकायदेशीर लस दिली जात आहे. या बाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत अनेकवेळा ठराव होऊन ही बदली होत नाही. एकाच ठिकाणी सलग १०-१२ वर्ष हे वैद्यकिय अधिकारी कसे काम करू शकतात या बाबत प्रशासनाने योग्य दखल घ्यावी.
- रामभाऊ कालगावकर
सदस्य, डोर्लेवाडी ग्रामपंचायत