गंभीर दरोड्यांचे तपास अद्यापही प्रलंबितच

By admin | Published: October 5, 2015 02:02 AM2015-10-05T02:02:25+5:302015-10-05T02:02:25+5:30

शहरात खळबळ माजवणाऱ्या अनेक खुनांचा तपास प्रलंबित असतानाच अनेक दरोड्यांचा तपासही अद्याप लागू शकलेला नाही.

The serious robbery investigation is still pending | गंभीर दरोड्यांचे तपास अद्यापही प्रलंबितच

गंभीर दरोड्यांचे तपास अद्यापही प्रलंबितच

Next

पुणे : शहरात खळबळ माजवणाऱ्या अनेक खुनांचा तपास प्रलंबित असतानाच अनेक दरोड्यांचा तपासही अद्याप लागू शकलेला नाही. किचकट आणि गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात पुणे पोलिसांना यश नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या ‘इच्छाशक्ती’चा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरोड्यांच्या प्रलंबित तपासासाठी तसेच दरोड्यांना पायबंद घालण्यासाठी गुन्हे शाखेचे दरोडा प्रतिबंधक पथक कार्यरत आहे. परंतु या पथकालाही चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाही. सातारा रस्त्यावरील रॉयल आर्केडचा दरोडा, लक्ष्मी रस्त्यावरील पोरवाल ज्वेलर्सचा दरोडा आणि कोरेगाव पार्क भागात दागिन्यांच्या दुकानावर पडलेला सशस्त्र दरोडा ही अलीकडच्या काळातील उदाहरणे आहेत.
सातारा रस्त्यावरच्या रॉयल आर्केड या सोसायटीवर सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी टाकलेला दरोडा आजही पुणेकरांच्या मनामध्ये ताजा आहे. १४ सप्टेंबर २०११ मध्ये घडलेल्या या घटनेच्या आठवणीनेही पोलिसांच्या अंगावर काटा उभा राहतो. सोसायटीमध्ये मध्यरात्री घुसलेल्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्यांनी हल्ला चढवला. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात अणकुचीदार रॉडने घाव लावून दुसऱ्या पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत एकूण पाच पोलीस गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी त्या क्षणी पकडलेल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी पळून गेलेले दरोडेखोर परत आले आणि पोलिसांना पुन्हा मारहाण करून त्याला सोडवून पळवून नेले. पोलीस दलासह पुण्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचा तपास लावण्यात मात्र पोलीस अपयशी ठरले. वास्तविक ही घटना पोलिसांनी आव्हान म्हणून स्वीकारण्याची आवश्यकता होती.
कापड आणि सोन्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मी रस्त्यावरच्या विजय मारोती चौकामध्येही चार सशस्त्र दरोडेखोरांनी पोरवाल ज्वेलर्स या सराफी पेढीवर दरोडा घातला होता. १३ जुलै २०१२ रोजी पडलेल्या या दरोड्यात दरोडेखोरांनी तब्बल अडीच किलो सोने, पाच किलो चांदी आणि दीड लाख रुपये लंपास केले होते. बंदुकीच्या धाकाने झालेली ही लूट उघडकीस आणण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले. दुकानात घुसलेल्या चार जणांनी त्यांचे हातपाय बांधून हा ऐवज लंपास केला होता. जंग जंग पछाडलेल्या पोलिसांच्या हाती मात्र काहीही लागू शकले नाही.कोरेगाव पार्क या गजबजलेल्या आणि उच्चभ्रू वस्तीमधील पीएमजी ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्याचा तपास अद्यापही अधांतरीच आहे. येथील लेन क्रमांक सहामध्ये असलेल्या पीएमजी जेम्स अ‍ॅन्ड ज्वेलर्स या सराफी दुकानावर चार जणांनी सशस्त्र दरोडा टाकत तब्बल १ कोटी ४२ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

Web Title: The serious robbery investigation is still pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.