"लगेच पैसे पाठवा"... आदर पूनावाला यांच्या नावाने सिरम इन्स्टिट्युटची १ कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 11:21 AM2022-09-10T11:21:33+5:302022-09-10T11:22:19+5:30
आदर पूनावाला यांच्या नंबरवरून बनावट व्हॉटस अॅप मेसेज देशपांडे यांना आले. त्यात काही बँक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले.
पुणे : सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉटसअॅप मेसेज पाठवून सिरम इन्स्टिट्युटला तब्बल १ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ७ ते ८ सप्टेंबर दरम्यान घडला आहे. याप्रकरणी सिरम इन्स्टिट्युटचे फायनान्स अधिकारी सागर कित्तुर (वय ४४, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कित्तुर हे सिरम इन्स्टिट्युटमध्ये फायनान्स व्यवस्थापक आहेत, तर सतीश देशपांडे हे कंपनीचे संचालक आहेत. आदर पूनावाला हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आदर पूनावाला यांच्या नंबरवरून बनावट व्हॉटस अॅप मेसेज देशपांडे यांना आले. त्यात काही बँक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले. हे मेसेज खरे वाटल्याने कंपनीचे खात्यावरुन विविध बँक खात्यावर एकूण १ कोटी १ लाख १ हजार ५५४ रुपये पाठविण्यात आले. त्यानंतर कंपनीची फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली असून पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते तपास करीत आहेत.