Adar Poonawalla Coronavirus Vaccination : "ज्यांना प्रवास...;" कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत अदर पूनावाला यांचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 11:12 PM2022-04-04T23:12:28+5:302022-04-04T23:12:57+5:30
सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी बूस्टर डोससंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.
Adar Poonawalla Coronavirus Vaccination : सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तर दुसरीकडे कमी होणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता कोविडचे सर्व निर्बंधही हटवले आहेत. दरम्यान, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी बूस्टर डोससंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. "देशानं योग्य लस निवडली म्हणूनच यावेळी देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे," असं ते म्हणाले. पुण्यात पत्रकारांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
देशात जर कोरोनाची चौथी लाट आली तर ती कमी घातक असेल अशी अपेक्षा असल्याचं पूनावाला म्हणाले. "बूस्टर डोसबद्दल आम्ही सरकारकडे आवाहन केलं आहे. कारण ज्यांना प्रवास करणं आवश्यक आहे त्यांना बूस्टर डोसची गरज आहे. आपण सरकार सोबत चर्चा करत असून लवकरच बूस्टर डोसवर एक धोरण घोषित केलं जाऊ शकतं," असंही ते म्हणाले.
Pune | We've appealed to the govt as everyone who needs to travel needs to take the booster dose. They're here having an internal discussion & should announce very soon in next few days on the booster policy: Adar Poonawalla, CEO, Serum Institute of India on COVID-19 booster dose pic.twitter.com/C9VXf9tKt4
— ANI (@ANI) April 4, 2022
बूस्टर डोसची वेळ आलीये
सर्वच देश ते करत आहेत आणि आता भारतासाठी याकडे (बूस्टर डोस) पाहण्याची वेळ आली आहे. केंद्रानं बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना लसीचे डोस देऊन उत्तम काम केलं आहे. आपल्या लसी अन्य देशांच्या तुलनेत चांगल्या सिद्ध झाल्या. अमेरिका आणि युरोपकडे पाहा, त्या ठिकाणी अधिक रुग्ण आहेत. आपण योग्य लसी निवडल्यामुळेच आपल्याकडे रुग्णसंख्या कमी असल्याचं पूनावाला म्हणाले.
यावेळी त्यांना ही लस कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटवर प्रभावी ठरेल का असा प्रश्न विचारण्यात आला. "त्या तेव्हाच काम करतील जेव्हा बूस्टर डोस घेतला जाईल. यामुळे भविष्यात येणाऱ्या व्हेरिअंटपासूनही सुरक्षा मिळेल. तज्ज्ञांची टीम सध्या दोन लसींच्या मिश्रणाच्या मुद्द्यावर विचार करत आहे. जगभरात त्याला मान्यता आहे," असं यावर इत्त देताना त्यांनी सांगितलं.