पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटने बनविलेल्या न्युमोनियाच्या लसीला DGCI ची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 11:00 PM2020-07-15T23:00:55+5:302020-07-15T23:03:27+5:30
प्रसिद्ध औषध निर्माता कंपनी सीरम इन्स्टीट्यूटकडून या लसीचे तीनवेळा क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर DGCI ने या लसीला परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या DGCI ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाचे प्रमुख व्ही.जे. सोमानी यांनी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने बनविलेल्या न्युमोनियावरील लसीला मान्यता दिली आहे. इंडीजेनियस न्युमोकोकल पॉलिसच्चराईड कॉन्जूगेट व्हॅक्सीन या भारतीय निर्माण असलेल्या न्युमोनियावरील लसीची निर्मित्ती सीरम इन्स्टीट्यूट या कंपनीने केली आहे. केंद्र सरकारने या लसीच्या वापरासाठी परवानगी दिल्याचं बुधवारी सांगितलं.
प्रसिद्ध औषध निर्माता कंपनी सीरम इन्स्टीट्यूटकडून या लसीचे तीनवेळा क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर DGCI ने या लसीला परवानगी दिली आहे. भारत आणि गांबिया येथे या औषधाची चाचणी घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले. या औषधाच्या पहिल्या फेझची चाचणी 2013 मध्ये घेण्यात आली होती. त्यासाठी 34 भारतीय वृद्ध नागरिकांवर त्याची चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर, दुसरी ट्रायल ही 12 ते 15 महिन्यांच्या 114 लहान मुलांवर घेण्यात आली आहे. तर, या लसीची तिसरी चाचणी ही वय वर्षे 6 ते 8 आठवड्यांच्या लहान बाळांवर घेण्यात आली असून गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात ही तिसरी ट्रायल पूर्ण झाल्याचे या लसीच्या नोंदणीनुसार लक्षात येते. दरम्यान, भारतात सध्या न्युमोनियाच्या लसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.