सिरम ‘कोव्होव्हॅक्स’च्या चाचण्या एप्रिलमध्ये, २० कोटी डोसचे नियोजन; जूनमध्ये टोचणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 06:47 AM2021-03-19T06:47:06+5:302021-03-19T06:47:41+5:30
“लसीची परिणामकारकता प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात या लसीच्या चाचण्या सुरू करण्यासंदर्भात अर्ज करण्यात आला आहे,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी नुकतीच ट्विट करून दिली. जून २०२१ पर्यंत ‘कोव्होव्हॅक्स’च्या प्रत्यक्ष वापराला सुरुवात होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पुणे: अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्स आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेली ‘कोव्होव्हॅक्स’ ही लस ऑगस्ट महिन्यापर्यंत बाजारात उपलब्ध होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यात या लसीच्या मानवी चाचण्यांना भारतात सुरुवात होणार आहे. मानवी चाचण्या सुरू असतानाच लसीचे उत्पादनही सुरू केले जाणार आहे. परवानगी मिळाल्यावर तत्काळ वितरणाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने सिरम इन्स्टिट्यूटने तयारी केली आहे. ‘कोव्हॅक्स’ देशांना पुरवाव्या लागणाऱ्या २० कोटी डोसचे अद्याप नियोजन सुरू असल्याचे समजते. (Serum ‘Kovovax’ tests in April, 200 million doses planned)
“लसीची परिणामकारकता प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात या लसीच्या चाचण्या सुरू करण्यासंदर्भात अर्ज करण्यात आला आहे,” अशी माहिती अदर पूनावाला यांनी नुकतीच ट्विट करून दिली. जून २०२१ पर्यंत ‘कोव्होव्हॅक्स’च्या प्रत्यक्ष वापराला सुरुवात होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
नोव्हाव्हॅक्स या अमेरिकी कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबतचे संशोधन व उत्पादन करण्याबाबत त्या कंपनीने सिरम इन्स्टिट्यूटशी ऑगस्ट २०२० मध्ये करार केला. नोव्हाव्हॅक्स कंपनीच्या लसीचे भारतात उत्पादन करण्याचा विशेष हक्क या कराराद्वारे सिरम इन्स्टिट्यूटला प्राप्त झाला. उच्च मध्यम किंवा उच्च उत्पन्न असलेले देश वगळता अन्य देशांसाठी कोरोना साथीच्या काळात सिरम इन्स्टिट्यूटला नोव्हाव्हॅक्स लसीचे उत्पादन करण्याचा हक्क या कराराद्वारे मिळाला. सर्व परवानग्या मिळून चाचण्या सुरळीत पार पडल्यास कोव्होव्हॅक्स ही भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळणारी आणखी एक महत्त्वाची लस असेल.
८९ टक्के परिणामकारक
- ब्रिटनमध्ये पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये कोव्होव्हॅक्स लसींची परिणामकारकता ८९.३ टक्के इतकी असल्याचे सिद्ध झाले आहे.
- यामध्ये १८ ते ८४ या वयोगटातील १५ हजार स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली.
- कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवरही ही लस प्रभावी असल्याचे विविध संशोधनातून सिद्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.