पत्नीच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत म्हणून नोकराने व्यावसायिकाला लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 03:20 PM2022-04-20T15:20:42+5:302022-04-20T15:22:00+5:30
या कर्मचाऱ्याला त्याच्या साथीदारांसह कोंढवा पोलिसांनी अटक केली...
पुणे : दूध व्यावसायिकावर कोयत्याने वार करीत जबरी चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. हा प्रकार संबंधित व्यावसायिकाच्या कामगारानेच मित्रांसमवेत केल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या वैद्यकीय उपचारांसाठी व्यावसायिकाने पगाराची रक्कम आगाऊ न दिल्याने त्याने हे कृत्य केल्याचा उलगडा झाला. या कर्मचाऱ्याला त्याच्या साथीदारांसह कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
आकाश सूर्यकांत पवार ( रा. वेताळवस्ती, कॅनॉल लगत, सासवड रोड, हडपसर ), मयूर उत्तम कांबळे (२१, धंदा भाजीविक्री, रा. बाप्पू हिंगणे चाळ, हडपसर गाव), अविनाश नागनाथ सूर्यवंशी (२२, धंदा मजुरी, रा. हिंगणे मळा, हडपसर गाव) आदित्य सतीश कोरडे (२०, धंदा नोकरी, रा. गोंधळेनगर, हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पांडुरंग सदाशिव कुरणे ( श्रिया प्लाझा, गणपती माथा मंदिर समोर वारजे माळवाडी) यांची दूध डेअरी आहे. ते १४ मार्चला दिवसभरातील १० हजार रुपयांची रोख रक्कम व लॅपटॉप घेऊन दुचाकीवरून जात होते. उंड्री येथील प्रिन्स टाऊन रॉयल सोसायटी समोर मोकळ्या जागेत ते लघुशंकेकरिता थांबले असता अनोळखी तीन व्यक्तींनी फिर्यादी यांना कोयत्याने मारून जखमी केले. त्यांच्याकडील लॅपटॉप व १० हजार रोख रक्कम लुटून नेली.
कुरणे यांच्याकडे आकाश सूर्यकांत पवार हा नोकरीस होता. त्याने पत्नीच्या उपचारांकरिता आगाऊ पगार मागितला होता. परंतु, फिर्यादी यांनी त्यास नकार दिला होता. त्याअनुषंगाने तपास करता आकाश पवार याने त्याच्या साथीदारांसह संगनमत करून फिर्यादी यांना लुटण्याचा कट केला, असे तपासात दिसून आले. त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, अंमलदार नीलेश देसाई, जोतिबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, सतीश चव्हाण, लक्ष्मण होळकर व किशोर वळे यांच्या पथकाने केली.