दुय्यम निबंधक कार्यालयाचा ‘सर्व्हर डाऊन’; नागरिकांची प्रचंड गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 05:20 AM2018-02-10T05:20:11+5:302018-02-10T05:20:20+5:30
गेल्या आठ दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी संपूर्ण राज्यातील सर्व्हर सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर लगेचच डाऊन झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे.
पुणे : गेल्या आठ दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी संपूर्ण राज्यातील सर्व्हर सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर लगेचच डाऊन झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. सर्व्हर डाऊनमुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेल्या नागरिकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे.
सदनिका, दुकाने, जमीन आदींच्या खरेदी-विक्रीसाठी नागरिकांना नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीसाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दस्त नोंदणीची ही संगणकप्रणाली राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) विकसित केली आहे. या प्रणालीसाठीचे तांत्रिक सहकार्य हे एनआयसीकडून दिले जाते. राज्यात सुमारे ५०६ दुय्यम निबंधक कार्यालये असून या कार्यालयांमध्ये सदनिका, दुकाने, जमीन आदींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार तसेच भाडेकरार, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र आदी प्रकारचे दस्त नोंदविले जातात. या कार्यालयांमध्ये हे दस्त नोंदविण्यासाठी नागरिकांची नेहमी गर्दी असते. राज्यात रोज सरासरी आठ ते नऊ हजार दस्तांची नोंदणी होते.
नोंदणी व मुद्रांक विभाग राज्याला महसूल देणारा दुसºया क्रमांकाचा विभाग आहे. दरवर्षी सुमारे २१ हजार कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. तसेच कार्यालयात येणाºया नागरिकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट एजंट्स या संघटनेने सोमवारी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांची भेट घेतली. नोंदणी विभागातील या समस्येवर आवश्यक ती कार्यवाही करून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट एजंट्स या संघटनेने नोंदणी महानिरीक्षकांकडे केली आहे. या वेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र चौकसे, संजय ढोकळे, राजेंद्र जोशी, उमाशंकर यादव आदी उपस्थित होते.
- दस्त नोंदणी प्रणालीमधील तांत्रिक समस्या अथवा सर्व्हरच्या डाऊन होण्यामुळे दस्त नोंदणीचे काम संथगतीने सुरू होते. अपेक्षित वेग मिळत नसल्याने दस्त नोंदणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर काहींना दस्त नोंदणीसाठी दुसºया दिवशी पुन्हा कार्यालयात यावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून दस्त नोंदणीच्या प्रणालीमधील तांत्रिक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीचे काम अपेक्षित वेगाने होत नाही. याविषयी वारंवार नागरिकांनी आपल्या तक्रारी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागात दिल्या आहेत. तरी यावर तोडगा काढण्यात नोंदणी विभागाला यश आलेले नाही.