नवनियुक्त १३०० कर्मचाऱ्यांची सेवा खंडित; कोरोना काळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 01:12 AM2020-07-19T01:12:30+5:302020-07-19T01:13:01+5:30
चालक व वाहकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महामंडळाने मागील वर्षी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली.
पुणे : सरळसेवा भरती प्रक्रियेतून चालक व वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या सुमारे १३०० कर्मचाऱ्यांची सेवा एसटी महामंडळाने तात्पुरती खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियुक्तीनंतर सहा महिन्यांतच त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. तसेच ३२०० कर्मचाºयांचे प्रशिक्षणही थांबविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना नियुक्तीपुर्वीच घरी बसावे लागणार आहे.
चालक व वाहकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महामंडळाने मागील वर्षी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली. त्यातून ८०२२ पदे भरली जाणार होती. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून परीक्षा घेण्यात आली. सुमारे ४५०० पात्र उमेदवारांपैकी १३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून डिसेंबरपासून चालक व वाहक पदावर नियुक्त्या देण्यात आल्या.
सध्या सुमारे ३,२०० चालक व वाहक तसेच २३२ अन्य पदावरील अधिकारी व कर्मचाºयांचे प्रशिक्षण सुरू होते. एसटीमध्ये नियुक्त होणारे कर्मचारी सुरूवातीला रोजंदारी गटात असतात. मागील चार महिन्यांपासून एसटीची सेवा बंद आहे. त्यामुळे महसुल थांबल्याने कर्मचाºयांच्या वेतनासाठीही पैसे नाहीत.
सध्या सुरू असलेल्या बस तसेच इतर सेवांसाठी आवश्यक मनुष्यबळापेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने रोजंदारीवर नियुक्त १३०० कर्मचाºयांची सेवा तात्पुरती खंडित केली आहे.
इंटकचा निर्णयास विरोध
महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने या निर्णयाला विरोध केला आहे. प्रशासनाने कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आणली आहे. लॉकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित कामगारांच्या वेतनात कोणतीही कपात न करण्याचा शासनाचा आदेश तरीही महामंडळच शासन निर्णयाला केराची टोपली दाखवित आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेऊन कर्मचाºयांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.