वैद्यकीय क्षेत्रात सेवावृत्ती, सातत्य गरजेचे : डाॅ. अभिजित पळशीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:53+5:302021-07-04T04:07:53+5:30
वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करायची असेल तर सेवावृत्ती, सातत्य आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सतत अभ्यासाशिवाय या क्षेत्रात ...
वैद्यकीय क्षेत्रात प्रगती करायची असेल तर सेवावृत्ती, सातत्य आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. सतत अभ्यासाशिवाय या क्षेत्रात टिकणे कठीण आहे, असे हृदयरोगतज्ज्ञ डाॅ. अभिजित पळशीकर यांनी सांगितले.
डाॅ. पळशीकर म्हणाले की, वैद्यकीय शिक्षण घेण्याआधीच हृदयरोग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एमबीबीएसला दोन सुवर्णपदके जिंकल्यानंतरही एमडी (मेडिसीन) आणि त्यानंतर हृदयरोगाशी संबंधित शिक्षण घेतले. हृदयरोग क्षेत्रातील नवनवे तंत्रज्ञान भारतात आणले. अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीचे तंत्रज्ञानामुळे हृदयरोगावर उपचार करणे सोपे झाले. भारतात दिवसेंदिवस हृदयरुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्वांवर वेळेत योग्य उपचार व्हावेत यासाठी नेहमी सज्ज असतो.
कार्डिओमेट क्लिनिकच्या माध्यमातून डाॅ. पळशीकर १५ वर्षांपासून हृदयरुग्णांवर उपचार करत आहेत. या काळात त्यांनी अनेक गंभीर रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवले आहेत. कोरोना काळात हृदयरुग्णांवर कशाप्रकारे उपचार केले या प्रश्नाला उत्तर देताना डाॅ. पळशीकर म्हणाले की, कोरोना काळात संसर्गाच्या भीतीने रुग्णांवर उपचार न करण्याचे धोरण अनाकलनीय होते. मात्र, आम्ही पीपीई किट वापरून रुग्णांवर उपचार केले. कोरोनामुळे अनेकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण अधिक होते. अशा रुग्णांवर आम्ही यशस्वी उपचार केले. कोरोनाचा संसर्ग, न्यूमोनिया आणि हृदयरोग अशा तीन गंभीर आजारांमुळे रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक होते. अशा शरीरात गुंतागुंत असलेल्या गंभीर रुग्णांवर उपचार या काळात केले. छातीत दुखणे, कळ मारणे, हृदयविकाराचा झटका तसेच हृदयाशी संबंधित सर्वच आजारांवर डाॅ. पळशीकर प्रभावी उपचार केले आहेत. एखादा रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर परिपूर्ण उपचार घेऊनच जातो. डाॅ. पळशीकर म्हणाले की, बदलती जीवनशैली, बदलता आहार, कामाचा ताण-तणाव यांमुळे रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगाचे प्रमाण जगभरात वाढत आहे. त्याचवेळी कोरोनामुळे संकटात भरच पडली आहे. मात्र, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोना काळातही हृदयरोगतज्ज्ञ म्हणून आमची लढाई सुरूच आहे. जगभरात होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हृदयरुग्णांवर उपचार करणे सोपे होत आहे. भविष्यात आणखी तंत्रज्ञानाची मदत घेऊन उपचार पद्धतीत होणारे बदल आत्मसात करण्याची गरज भासणार आहे.
आजारपणातून रुग्णांची सुटका व्हावी, तातडीने उपचार मिळावेत, रुग्णांची सुश्रुषा करता यावी, यासाठी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. भविष्यातही हेच ध्येय ठेऊन काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या क्षेत्रात येण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी केवळ पैसा कमावणे हा उद्देश न ठेवता दिवसरात्र कष्ट करण्याची तयारी ठेवावी. तरच वैद्यकीय क्षेत्रात निभाव लागणे शक्य आहे, असेही डाॅ. पळशीकर म्हणाले.
(विशेष मुलाखत)