"भाजपासाठी सेवा हेच संघटन, सेवाकार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला विश्रांतीला परवानगी नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 08:55 PM2021-10-27T20:55:11+5:302021-10-27T20:58:25+5:30

Chandrakant Patil And BJP : "सामाजिक तथा राजकीय जीवनात काम करत असताना, आपल्याला विश्रांती घेण्याची कधीही परवानगी नसते."

Service for BJP is an organization, service workers are not allowed to rest says chandrakant patil | "भाजपासाठी सेवा हेच संघटन, सेवाकार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला विश्रांतीला परवानगी नाही"

"भाजपासाठी सेवा हेच संघटन, सेवाकार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला विश्रांतीला परवानगी नाही"

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशानुसार सेवा हेच संघटन हा भारतीय जनता पार्टीसाठी मंत्र असून त्यानुसार सेवाकार्य करणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही विश्रांती घेण्याची परवानगी नसते. कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती, हा माझा संकल्प असल्याची भावना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पाटील यांच्या ४५ वर्षांच्या समाजिक तथा राजकीय जीवनावर आधारीत चित्रचरीत्र (कॉफीटेबल बुक)चे प्रकाशन मंगळवारी पुण्यात कोथरुड विधानसभा मतदारसंघात संपन्न झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सचिव तथा पुणे शहर प्रभारी धीरज घाटे, आ. मुक्ताताई टिळक, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे,  भीमराव आण्णा तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे,  दीपक पोटे, दीपक नागपुरे, गणेश घोष, पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र (बापू) मानकर, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

चित्रचरीत्राच्या प्रकाशनानंतर बोलताना पाटील यांनी “देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सेवा हेच संघटन’ मूलमंत्र घेऊन भाजपाचे सर्व कार्यकर्ते काम करत असतात. त्यामुळे सामाजिक तथा राजकीय जीवनात काम करत असताना, आपल्याला विश्रांती घेण्याची कधीही परवानगी नसते. त्यामुळे कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती! हा संकल्प अंगी बाणवून काम करायचे असते” असं म्हटलं आहे.  

ते पुढे म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला एकदा प्रश्न विचारला होता की, ‘तू ज्या गावात राहतोस; त्या गावात कोणीही दु:खी राहिलेलं नाही, अशी स्थिती येण्यासाठी किती वर्षे लागतील?’ त्यावर मी त्यांना नम्रपणे म्हटले होतं की, ‘उत्तर देण्याऐवजी काम करायला सुरुवात करतो!’ त्यानंतर मी माझ्या २२०० लोकसंख्या असलेल्या गावापासून सुरुवात केली. फडणवीस यांच्या काळात मंत्री असताना खूप काही करता आलं. त्यानंतरच्या काळातही कोल्हापूर, पुणे किंवा इतर कोणत्याही शहरातून जे काही करत असतो, ती माझी काही योजना म्हणून नाही, तर मोदींना दिलेला शब्द आहे आणि त्यानुसारच मी काम करत असतो. महापालिकेच्या माध्यमातूनही तशी स्थिती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना पाटील म्हणाले की, “योजना तयार करणे आणि त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करणे हेच आपलं काम असलं पाहिजे. त्यावर निवडणुका सहज जिंकता येतात. कोविडमध्ये तुम्ही जे केले, ते लोक कधीही विसरणार नाही आहेत. त्यामुळे सेवेच्या माध्यमातून कोथरुड विधानसभा मतदारसंघामधून शंभर टक्के सर्व नगरसेवक भाजपाचे निवडून आले पाहिजेत. तसेच महापालिकेतील विजयानंतरही सेवा हा मंत्र मानूनच आपण सर्वांनी काम केलं पाहिजे” अशी सूचनाही त्यांनी यावेळी केले.

माजी केंद्रीय मंत्रीप्रकाश जावडेकर म्हणाले की, मोदीजी नेहमी सांगतात की, कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाचा प्राण आहे. आणीबाणीच्या कालखंडानंतरच्या सभासद नोंदणी अभियानाला अत्यल्प प्रतिसाद मिळायचा. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज भाजपा हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. कोथरुडमधील जयभवानी नगरमधील कार्यकर्त्यांची यादी मी जेव्हा पाहिली, आणि त्याची प्रत्यक्ष पडताळणी केली, तेव्हा लक्षात आलं की, सर्वसामान्यांनी अतिशय मनाने भाजपाला आपलंसं केलं आहे.” 

चंद्रकांत पाटील यांच्याबद्द्ल बोलताना ते म्हणाले की, “दादांना मी विद्यार्थी परिषदेपासून पाहतो. ते अतिशय उत्तम कार्यकर्ते आहेत; त्यामुळेच आज ते पक्षाचे नेते झाले आहेत. त्यामुळे हा केवळ दादांचा गौरव नाही, तर सर्व कार्यकर्त्यांचा गौरव आहे. कार्यकर्त्यांच्या जोरावर ज्याप्रमाणे आपण दोन वेळा लोकसभेत बहुमत मिळावलं. विधानसभेत यश मिळवलं, त्याप्रमाणे आगामी महापालिका निवडणुकीतही आपण निर्विवाद यश मिळवू,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केले, तर स्वागत कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव मुरकुट यांनी केले. आभार प्रदर्शन पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी केले.

Web Title: Service for BJP is an organization, service workers are not allowed to rest says chandrakant patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.