पालखीच्या प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत सेवा; वारीसाठी 'डायल १०८' च्या ७५ रुग्णवाहिका तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 12:49 IST2023-06-11T12:48:43+5:302023-06-11T12:49:05+5:30
ashadhi wari: वारीत कुठलाही आपत्कालीन वैद्यकीय प्रसंग उद्भवल्यास १०८ टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास तत्काळ रुग्णवाहिका वारकऱ्यांना उपलब्ध

पालखीच्या प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत सेवा; वारीसाठी 'डायल १०८' च्या ७५ रुग्णवाहिका तैनात
पुणे : बी.व्ही.जी. व महाराष्ट्र आपात्कालीन वैद्यकीय सेवा डायल १०८ यांनी आषाढी वारीसाठी जिल्हानिहाय रुग्णवाहिकेचे नियोजन केले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व संत सोपान महाराज पालखी सोहळ्यात डायल १०८ च्या ७५ रुग्णवाहिका तैनात ठेवल्या आहेत. या रुग्णवाहिका प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत व पंढरपुरात ही डायल १०८ सुविधेचा वापर वारकऱ्यांना करता येईल.
पालखी सोबत व पालखी मार्गामध्ये ठिकठिकाणी डायल १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुठलाही आपत्कालीन वैद्यकीय प्रसंग उद्भवल्यास १०८ टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्यास तत्काळ रुग्णवाहिका वारकऱ्यांना उपलब्ध होऊ शकेल.
पुणे जिल्हा ५३ रुग्णवाहिका (१४ एएलएस ३९ बीएलएस)
सातारा जिल्हा ६ रुग्णवाहिका (१ एएलएस व ५ बीएलएस)
सोलापूर जिल्ह्यात १६ रुग्णवाहिका ( ७ एएलएस व ९ बीएलएस )
पंढरपूर शहरात २९ जुलै राेजी आषाढी एकादशीला सुद्धा १५ स्वतंत्र रुग्णवाहिकेचे नियोजन केले आहे. या रुग्णवाहिका आषाढी एकादशीच्या आधीपासून उपलब्ध करून देण्यात येतील. डायल १०८ ची सेवा प्रभावीपणे देण्यासाठी पंढरपुरात डायल १०८ चे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येईल. हा नियंत्रण कक्ष एमर्जन्सी ऑपरेटिंग सिस्टमशी समन्वय साधून प्रभावी सेवा दिली जाईल. डायल १०८ सेवेच्या माध्यमातून २०१४ ते २०२२ या दरम्यान ४ हजार ५२९ रुग्णांना जीवनदान मिळाले. तसेच २ लाख ६१ हजार ६३० रुग्णांना जागेवर उपचार देण्यात आल्याची माहीती डायल १०८ चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. प्रियांक जावळे यांनी दिली.