गोरगरीब समाजसेवेत, श्रीमंत पैसे कमावण्याच्या मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:10 AM2021-02-07T04:10:59+5:302021-02-07T04:10:59+5:30

डॉ. अशोक बेलखोडे : डाॅ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्काराने होणार गौरव डॉ. बेलखोडे : आज अनिता अवचट ...

In the service of the poor, behind the making of the rich | गोरगरीब समाजसेवेत, श्रीमंत पैसे कमावण्याच्या मागे

गोरगरीब समाजसेवेत, श्रीमंत पैसे कमावण्याच्या मागे

Next

डॉ. अशोक बेलखोडे : डाॅ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्काराने होणार गौरव

डॉ. बेलखोडे : आज अनिता अवचट पुरस्कार प्रदान सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “समाज भांडवलशाहीकडे, चंगळवादाकडे वळला आहे. समाजसेवा इतरांनी करावी, अशी अपेक्षा नेहमी केली जाते. मात्र, आपण स्वतः समाजासाठी काय करणार? गोरगरीब लोक जमेल तशी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करतात. श्रीमंत लोक मात्र आपल्या मुलांनी भरपूर पैसे कमवता येईल, अशा व्यवसायात जावे अशी इच्छा बाळगून असतात,” असे मत भारत जोडो युवा अकादमीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केले.

मराठवाड्यातील किनवट या एकमेव आदिवासी तालुक्यात गेली अनेक वर्षे ‘आरोग्यदूत’ बनून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. बेलखोडे यांना रविवारी (दि.७) डाॅ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्काराने गौरवले जाणार आहे. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात दुुपारी चार वाजता होणाऱ्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि अभिनेते डाॅ. मोहन आगाशे असणार आहेत. डाॅ. आनंद नाडकर्णी पुरस्कार्थींशी संवाद साधणार आहेत. बहुविकलांग टिंकेश कौशिक यांचाही यावेळी गौरव होणार आहे. यानिमित्त ‘लोकमत’ने डॉ. बेलखोडे यांच्याशी संवाद साधला.

डॉ. बेलखोडे म्हणाले की, समाजाने स्वतःला खूप बदलण्याची गरज आहे. सामाजिक कार्य करण्याची ऊर्मी दिवसेंदिवस कमी होत आहे. गांधी विचारांचे संस्कार करणाऱ्या संस्था ओस पडत आहेत. अशा वेळी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी दुप्पट जोमाने काम करण्याची, पुढील पिढीवर समाजकार्याचे संस्कार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कुटुंबातूनही समाजसेवेचे बाळकडू मिळायला हवे.

डॉ. बेलखोडे यांनी विद्यार्थीदशेपासूनच डॉ. शशिकांत अहंकारी यांच्यासह ‘हॅलो’ या संघटनेमार्फत आरोग्यविषयक जनजागृती चळवळीत सहभाग घेतला. डॉ. बाबा आमटे, यदुनाथ थत्ते आणि डॉ. बाबा आढाव यांच्या प्रभावाने त्यांनी कामाला सुरुवात केली. साने गुरुजी आणि राष्ट्र सेवा दलाचे संस्कार त्यांच्यावर झाले. आपल्या शिक्षणाचा उपयोग वंचितांसाठी करायचा, हे ठरवून त्यांनी किनवट या आदिवासी तालुक्यात काम सुरू केले. या सर्व वाटचालीत घरचे संस्कार महत्त्चाचे ठरले. डॉ. अनिल अवचट यांच्या लेखनातून त्यांची मैत्री झाली. किनवट येथे ‘मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ची उभारणी, ‘पॅलिएटिव्ह केअर होम’साठी आरोग्य सेवा, व्यापक विज्ञान केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

Web Title: In the service of the poor, behind the making of the rich

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.