मुंबई - कोल्हापूर महामार्गावरील सेवा रस्त्यांना पावसाने ओढ्यांचे स्वरूप
By निलेश राऊत | Published: April 14, 2023 06:58 PM2023-04-14T18:58:11+5:302023-04-14T18:58:26+5:30
अवकाळी पावसामुळे रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये पाणी
पुणे : मुंबई कोल्हापूर महामार्गावर महापालिका हद्दीतून जाणाऱ्या महामार्गालगत करण्यात आलेल्या सेवा रस्त्यांला (सर्व्हिस रोड) गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसाने ओढ्यांचे स्वरूप आल्याने येथून वाट काढणे जिकिरीचे झाले होते.
चांदणी चौक ते बावधान या परिसरात महामार्गावरील तसेच उंच भागातील पाणी या ठिकाणी उतरत असल्याने येथील सेवा रस्ते आहेत की ओढे हा संभ्रह होत होता. स्थानिकांनी याबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अद्यापही येथे पावसाळी गटारे तयार करून महामार्गावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना केली जात नसल्याने येथील मिळकतींमध्ये पाणी घुसून त्यांचे आतोनात नुकसान होत आहे.
चांदणी चौकातून पाषाणच्या दिशेने येताना तीव्र उतार आहे. या भागात बावधान परिसरात सेवा रस्ते असून, त्यांच्या बाजूला अनेक खाजगी मिळकती आहेत. यामध्ये विविध सोसायट्या, शोरूम व व्यावसायिक गाळे आहेत. या भागात बावधान व पौडच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांची या सेवा रस्त्यांवरून मोठी ये-जा असते. तसेच या ठिकाणी राहणारे नागरिक या रस्त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. मात्र या रस्त्यांलगत पावसाळी गटारे नसल्याने पावसाळ्यात या हे रस्ते ओढ्यांचे स्वरूप घेतात.
याची प्रचिती गुरूवारी (दि.१३) झालेल्या अवकाळी पावसाने आली. या परिसरातील अनेक शोरूममध्ये तसेच सोसायटयांमध्ये महामार्गावरील व उंच भागातील पाणी घुसले. सेवा रस्त्यावर आलेल्या या पाण्याचा निचरा होत नसल्याने त्याचा फटका या भागातील मिळकतींना झाला. अवघ्या दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यापूर्वी तरी येथील पावसाळी गटारांचे काम महापालिकेने पूर्ण करून, सेवा रस्त्यांवर येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.