लावणी कलावंतांकडून वारकऱ्यांची सेवा; जेवणाबरोबरच लावणी व भक्तिगीतांचा अनोखा कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 04:49 PM2022-06-26T16:49:59+5:302022-06-26T16:51:03+5:30
दोन वर्षाच्या खंडानंतर परत जोमाने लावणी कलावंतांनी वारीतील वारकऱ्यांची सेवा केली
यवत : "चौफुला" असे नाव महाराष्ट्रात घेतले सर्व मराठी लोकांना आठवण होते ती लावणीची ......चौफुला येथील कला केंद्रांमध्ये अनेक लावणी कलावंत त्यांची लावणीची कला सादर करत असतात. चौफुला येथील कला केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रात लावणी रसिकांच्या मनात अधिक प्रसिद्ध आहेत. वाखारी येथील न्यू अंबिका कला केंद्रातील लावणी कलावंतांनी त्यांची कला जोपासत असताना वारीतील तब्बल ८ हजार वारकऱ्यांना जेवणाची व्यवस्था व बरोबर भक्तिगीते - लावणीचे कार्यक्रम आयोजित केले होते.
न्यू अंबिका कला केंद्रातील लावणी कलावंत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करून वारीतील तब्बल ८ हजार वारकऱ्यांना कला केंद्रात जेवण दिले. मागील काही वर्षांपासून दिवसेंदिवस सदर उपक्रम आणखी मोठा आणि अधिक सेवाभावपणे कसा करता येईल, यासाठी कला केंद्राचे संचालक अशोक जाधव व जयश्री जाधव मोठे कष्ट घेतात. दोन वर्षाच्या खंडानंतर परत जोमाने लावणी कलावंतांनी वारीतील वारकऱ्यांची सेवा केली.
यवत येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर पहाटे निघालेले वारकरी आठ वाजल्यांनंतर वाखारीच्या जवळपास पोहोचण्यास सुरुवात होते. तेथे न्यू अंबिका कला केंद्रात सकाळ पासूनच जेवण दिले जाते. कला केंद्रातील कलावंत जेवण तर देतात याचबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांसाठी भजने भक्तिगीते व लावण्यांचा एकत्र असा जुगलबंदीचा कार्यक्रम देखील सादर करतात. यामुळे चालून चालून थकलेल्या वारकरी मंडळींना एक दुपारचा विरंगुळा देखील होतो. तर यवत ते वरवंड हा टप्पा १५ किलोमीटर अंतराचा असल्याने तुलनेने लहान असतो.यात विश्रांती घेण्यासाठी वारकरी मंडळींना वेळ मिळतो. यातच लावणी कलावंत पंढरीच्या वाटेवर त्यांना भक्तिगीते सादर करून त्यांचे मनोरंजन करतात.