काळ्या आईची सेवा अन् गोमातेचे रक्षण
By admin | Published: July 24, 2016 05:29 AM2016-07-24T05:29:02+5:302016-07-24T05:29:02+5:30
काळ्या मातीत तिफन चालवून मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे आपले राज्य. मात्र, शहरीकरणाचे तण वाढत गेले आणि त्यातून गुंठामंत्र्यांचं पिक फुटत गेलं. शेती परवडत नाही, म्हणून
पुणे : काळ्या मातीत तिफन चालवून मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे आपले राज्य. मात्र, शहरीकरणाचे तण वाढत गेले आणि त्यातून गुंठामंत्र्यांचं पिक फुटत गेलं. शेती परवडत नाही, म्हणून गुंठ्यासाठी काळ्या आईच्या हृदयाचे तुकडे पडू लागले. परंतु, पुरंदरसारख्या दुष्काळी तालुक्यातील मावडीच्या माळरानावर नंदनवन फुलविण्याची किमया अभय बन्सीलाल संचेती यांनी साधली आहे.
यातून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत आहे, पण विशेष म्हणजे स्वत:च्या ‘फार्महाऊस’साठी नव्हे, तर त्यांनी येथे गोमातेची सेवा करण्यासाठी गोशाला फुलविली आहे.
याबाबत संचेती म्हणाले, ‘‘ही प्रेरणा मला येरवडा कारागृहात मिळाली. राष्ट्रसंत कमलेश मुनीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आपण विजय भंडारी व त्यांच्या सहकाऱ्यांसह येरवडा कारागृहात गोशाळा सुरू केली होती. कत्तल करण्यासाठी नेल्या जाणाऱ्या गोमातांना येथे आणले जायचे. ‘क्रूरतेकडून करुणेकडे’ या उक्तीप्रमाणे कळत-नकळत हातून गुन्हा घडल्याने शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या मनामध्येही करुणेचा भाव जागृत व्हावा, त्यांच्या हातून गोमातेची सेवा घडावी आणि त्यांच्यावरील गुन्हेगार हा शिक्का पुसून निघावा, ही यामागची भूमिका होती. त्याला यश येऊन गोमातेची सेवा करता करता अनेक कैदी भविष्यात चांगले आयुष्य जगू लागले.’’
या उपक्रमातूनच प्रेरणा घेऊन हे काम आणखी वाढविण्याचे संचेती यांनी ठरविले. पुरंदर तालुक्यात मावडी या गावात ओम गुरू आनंद गोशाळा सुरू केली. याबाबत ते म्हणतात, ‘‘रखरखत्या माळरानावर ऊन लागू नये, म्हणून गार्इंसाठी पत्र्याची शेड टाकण्यात आली. त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका खोदण्यात आली.
रोज ताजा चारा आणि इतर खाद्याची व्यवस्था करून सर्वसोईयुक्त अशा गोशाळेने रूप घेतले. खरं तर दुष्काळी परिस्थितीत या गार्इंची सेवा करणे म्हणजे एक आव्हानच होते; पण ती जबाबदारी स्वीकारली. ऐन दुष्काळात टँकरने पाणी विकत घेऊन आणि मागेल ते दाम देऊन चारा विकत घेऊन या गार्इंचे संगोपन करण्यात आले.’’
सामाजिक बांधिलकीही जपली
विहिरीमध्ये थोडे पाणी शिल्लक होते. गावातील शेतकऱ्यांचीही तहान भागवायची होती. त्यांना विहिरीतील पाणी द्यायचे, वेळप्रसंगी टँकर उपलब्ध करून द्यायचा आणि आपलीही शेती जगवायची, असा प्रयत्न सुरू झाला. या प्रामाणिक प्रयत्नांना यश आले आणि शेती जगली.
दुष्काळात शेती जगविण्यासाठी लढाई करताना निसर्गाने अनेक पाठ शिकविलेही. आधुनिक पद्धतीने शेती, पाण्याची बचत, पाण्याचे योग्य व्यवस्थापन, पिक पद्धत या अनेक गोष्टी यातून शिकायला मिळाल्या. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने पाण्याची बचतही होऊ लागली आणि पिकाला गरजेएवढे पाणीही मिळू लागले. उपलब्ध पाण्यात जे पिक तग धरू शकेल आणि ज्याला बाजारपेठेत भाव मिळेल, असेच पिक घेण्यास सुरुवात केली. शेतानजीकच फळबाग फुलविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. खडकाळ माळरानावर हापूस आंबा, पपई, पेरू, सीताफळ, डाळिंब अशा फळबागेने आकार घेतला. ही बाग जगविण्यासाठीही त्यांनी जातीने लक्ष घातले.
शेतकऱ्यांना उपदेश करणे सोपे, परंतु दुष्काळात त्याला काय थपडा खाव्या लागतात, याचा अनुभव गोशाळेच्यानिमित्ताने संचेती यांनी घेतला. शेतकरी म्हणून या झळा आपण सहन केल्या पाहिजेत, या जाणिवेने त्यांनी शेती करण्याचा निर्धार केला.
गोशाळेसाठी संचेती यांना मोहनलाल संचेती, गजानन श्रीश्रीमाळ, धनराज कटारिया, नंदकुमार चोरडिया, दिलीपकुमार दर्डा, राजेंद्र भटेवरा, जेठमल दधीच, विजय शिंगवी यांनी सहयोग दिला. गोशाळेच्या देखभालीसाठी मनीष संचेती, सोभाचंद बिनवडे सहकार्य करीत आहेत.
हा प्रवास उलगडताना अभय संचेती म्हणाले, ‘‘गोशाळेनजीकच सुमारे पंधरा एकर खडकावर शेती फुलविण्याचा निश्चय केला. नजीकच्या कोरड्या पडलेल्या तलावांतील सुपीक गाळ माती या खडकांवर आणून टाकण्यास त्यांनी सुरुवात केली. पडेल तितके पाणी साठले पाहिजे, म्हणून त्यांनी विहिरी खोदल्या. पुढच्या हंगामात थोडा पाऊस झाला. गोशाळेमुळे गोमूत्र, शेण उपलब्ध होतेच. त्याचे खत बनवून शेतीला देण्यात आले. साठलेल्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून ते पिकाला देण्यात आले आणि खरोखरच किमया झाली. ज्वारीचे पीक डौलाने उभे राहिले. सुमारे दहा फूट उंच उभे राहिलेले रसरशीत कणीस पाहून आसपासच्या शेतकऱ्यांनीही तोंडात बोटे घातली. नजर लागण्यासारखीच परिस्थिती होती आणि तसेच झाले. पुढील दोन वर्षे पावसाने पाठ फिरविली. होत्याचे नव्हते होण्याची वेळ आली. पण जिद्द सोडली नाही.’’
सोनं-नाणं हे क्षणिक सुख देणारं आहे; पण शेती ही आपली आई आहे. पिढ्यान्पिढ्या ती आपल्याला आधार देते. म्हणून पैशाच्या मोहापायी तिला विकू नका. पुढच्या पिढीचा थोडा विचार करा, आपला देश कृषिप्रधान आहे. जमिनीवर मजल्यावर मजले उभे राहतील; पण शेतीच नसेल तर पिकणार काय आणि आपण खाणार काय? शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका, लढा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
- अभय संचेती