मेट्रो रुळावर पेट्रोल घेऊन आंदोलन करणाऱ्या नऊ महिलांना सत्र न्यायालयाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर
By नम्रता फडणीस | Updated: March 26, 2025 20:52 IST2025-03-26T20:51:57+5:302025-03-26T20:52:19+5:30
आंदोलक स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत असताना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या डोळ्यातही पेट्रोल गेले होते

मेट्रो रुळावर पेट्रोल घेऊन आंदोलन करणाऱ्या नऊ महिलांना सत्र न्यायालयाचा दिलासा; सशर्त जामीन मंजूर
पुणे : रोजगार व मोफत आरोग्य सेवांच्या मागण्यांसाठी पुणे मेट्रो स्थानकाच्या जवळील रुळावर आंदोलन करणा-या नऊ महिलांना सत्र न्यायालयाने दिलासा दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एल टिकले यांनी महिलांना 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटी-शर्तीवर जामीन मंजूर केला.
शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे पोलीस उपनिरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार काही आंदोलक मनपा जवळील मेट्रो स्थानकावर आंदोलन करीत होते. त्यांच्याजवळ पेट्रोलची बाटली असून, ते पेट्रोल फेकण्याची धमकी देत होते. आंदोलक स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकत असताना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या डोळ्यातही पेट्रोल गेले. या घटनेनुसार भारतीय न्याय संहिता, मेट्रो रेल्वेज संचलन व देखभाल दुरुस्ती कायदा २०२२ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. महिला आरोपीनी अँड सचिन झालटे- पाटील व अँड दुर्गे यांच्या मार्फत जामिनासाठी अतिरिक्त सत्र न्यायाधीश टिकले यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. अँड झालटे पाटील यांनी युक्तिवाद केला की आंदोलक हे बेरोजगार असून, ते रोजगार व आरोग्य सेवेची मागणी करत होते. त्यांचा मेट्रोचे नुकसान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यात काही महिला आंदोलकांचाही समावेश होता. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरीत न्यायालयाने महिला आंदोलकांना सशर्त जामीन मंजूर केला.