मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 11:08 AM2024-11-08T11:08:23+5:302024-11-08T11:08:57+5:30
महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Maval Vidhan Sabha ( Marathi News ) :मावळ विधानसभा मतदारसंघातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. कारण शेळके यांच्याविरोधात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुरुवारी रात्री ११ नंतरही प्रचार रॅली सुरू ठेवत फटाके फोडल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मावळात यंदा विद्यमान आमदार सुनील शेळके विरुद्ध अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांकडून लोकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी जोरदार प्रचारही सुरू आहे. मात्र सुनील शेळके यांच्याकडून काल रात्री उशिरापर्यंत प्रचाररॅली करत फटाके फोडण्यात आले. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शेळके यांच्यासह नामदेव दाभाडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मावळमध्ये कसं आहे राजकीय चित्र?
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मावळमध्ये एकूण १८ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननी प्रक्रियेत सहा अर्ज बाद झाले होते. तर अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी सहा जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे मावळच्या रिंगणात फक्त सहाच उमेदवार राहिले आहेत. बापू भेगडे यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके विरुद्ध बापू भेगडे अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके महायुतीचे उमेदवार आहेत. शेळके राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे असून, त्यांना पक्षांतर्गत बापूसाहेब भेगडे यांचे तगडे आव्हान होते. भेगडे यांची महामंडळावर वर्णी लावून त्यांच्या नावावर फुली मारल्याचे स्पष्ट झाले होते. पण, भेगडे यांनी महामंडळ नाकारून निवडणूक लढवणार असल्याची ठाम भूमिका घेतली. तसेच, अपक्ष निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांना भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीनेही उमेदवार न देता पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेळके यांच्यासमोर भेगडे यांचे तगडे आव्हान असणार आहे.