उसने पैशांच्या वाद, मित्रालाच दिले पेटवून, उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 10:34 AM2021-10-01T10:34:21+5:302021-10-01T10:37:37+5:30
हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुरसुंगी गुरुवारी हा प्रकार घडला
पुणे: दोन मित्रांमध्ये उसन्या पैशावरून झालेला वाद टोकाला पोहोचला. त्यातील एकाने दुसऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या दुसऱ्याचा ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फुरसुंगी गुरुवारी हा प्रकार घडला. संतोष दादाराव कागदे (वय 51, रा. भैरवनाथ मंदिर समोर आंबेगाव बुद्रुक हवेली पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मनोज मोहन कांदे (वय 28, रा. संकेत विहार फुरसुंगी पुणे) याला अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष आणि मनोज दोघेही मित्र होते. यातील आरोपी मनोज कांदे याने संतोष कागदे याच्याकडून उसने पैसे घेतले होते. या उसने पैशावरून त्या दोघात सातत्याने वाद होत होते. दरम्यान गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ते फुरसुंगी तील संकेत विहार येथील एका विहिरीजवळ भेटले. इथे त्यांचा पुन्हा एकदा भांडण झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला 'तुला पेट्रोल टाकून जाळून खल्लास करतो' असे म्हणून त्याच्या अंगावर बाटली मधील पेट्रोल ओतून काडी पेटवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान या घटनेत संतोष कागदे हे गंभीररीत्या भाजले होते. उपचारासाठी त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असताना सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्ह्यांमध्ये भादवि 302 अन्वये कलम वाढ करण्यात आली आहे.