‘सेट-नेट’ला पर्याय गुणवत्तेला अडसर
By admin | Published: May 12, 2017 05:38 AM2017-05-12T05:38:19+5:302017-05-12T05:38:19+5:30
महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता असलेल्या सेट/नेटच्या पदवीला पीएच.डी.चा पर्याय उपलब्ध करून
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता असलेल्या सेट/नेटच्या पदवीला पीएच.डी.चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याने पीएच.डी. संशोधनाचा दर्जा घसरला असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाकडून (यूजीसी) सेट/नेट परीक्षेला २००९मध्ये हा निर्णय झाल्यावर अचानक पीएच.डी.साठी रजिस्ट्रेशन करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. अभिमत, खासगी, मुक्त विद्यापीठांमध्ये पीएच.डी.च्या प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी लागली. त्यातून कॉपी पेस्ट संशोधनामध्ये अचानक मोठी वाढ झाली. गाइड व विद्यार्थी यांच्या संगनमताने दर्जाहीन संशोधनांना पीएच.डी.च्या डिग्री बहाल करण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
माजी अधिसभा सदस्य अतुल बागुल यांनी याबाबत सांगितले, ‘‘सेट/नेट परीक्षेला पीएच.डी.चा पर्याय केल्यामुळे संशोधनाचा फुगवटा तयार झाला आहे. पीएच.डी.ची नियमावली कडक करण्यात आली आहे; मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसून येत नाही. प्राध्यापकांनी पीएच.डी.ची डिग्री घेतल्यानंतर, पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणात संशोधन करणे अपेक्षित असते; मात्र एकदा पीएच.डी.ची डिग्री हातात पडली की, पुन्हा ते संशोधनाच्या वाट्याला जात नाहीत.
पीएच.डी. संशोधनाबाबत अनेकदा गाइड आणि विद्यार्थी यांच्या कडून सार्वजनिक अप्रामाणिकपणा केला जात असल्याचे दिसून येतो.’’
यूजीसीकडून पीएच.डी. प्रवेश व इतर नियमावलीमध्ये फेरबदल करून पीएच.डी.चा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न केले; मात्र या नियमांनाही अनेक पळवाटा विद्यापीठ पातळीवर शोधण्यात आल्याचे दिसून येत आहे.