उद्योगांवर सेन्सर यंत्रणा बसविणार
By admin | Published: January 8, 2016 01:43 AM2016-01-08T01:43:59+5:302016-01-08T01:43:59+5:30
गेल्या ६८ वर्षांपासून नद्यांमध्ये सुधारणा होण्याऐवजी त्यात ८६ टक्के प्रक्रिया न झालेले मैलापाणी सोडण्यात येत आहे. त्यात शेतातील रासायनिक खते,
पुणे : गेल्या ६८ वर्षांपासून नद्यांमध्ये सुधारणा होण्याऐवजी त्यात ८६ टक्के प्रक्रिया न झालेले मैलापाणी सोडण्यात येत आहे. त्यात शेतातील रासायनिक खते, कीटकनाशकयुक्त पाणी, औद्योगिकीकरणातूनही सांडपाणी सोडले जात आहे. यामुळे उद्योगांवर चिमण्यांवर आणि सांडपाणी सोडण्याच्या यंत्रणेवर सेन्सर यंत्रणा बसवून मानकांपेक्षा जास्त वायू किंवा जलप्रदूषण झाल्यास थेट प्रदूषण महामंडळालाच त्याचा संदेश जाईल, अशी यंत्रणा बसविली जाणार आहे. देशात १,८०० उद्योगांवर अशी यंत्रणा बसविण्यात आली असून, ती यशस्वी ठरत असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
दहाव्या किलोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून करण्यात आले. या वेळी आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ते जॉन बोमन, अध्यक्ष माधव चंद्रचूड, निमंत्रक आरती किर्लोस्कर, अतुल किर्लोस्कर, संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते. या वेळी पर्यावरण क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ‘किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. माळढोक पक्ष्यांसाठी काम करणारे डॉ. प्रमोद पाटील, नद्यांसाठी काम करणारे सागर यादवाडकर, हत्तींच्या संरक्षणासाठी झटणारे आनंद कुमार आणि गीर येथील द लायन्स क्वीन्स आॅफ इंडियाच्या रसिलाबेन वाधेर यांचा सन्मान झाला. वाईल्डलाईफ छायाचित्र व निसर्गावर बेतलेल्या चित्रपटविजेत्यांचाही सन्मान झाला.