लोणावळ्यात आजपासून बंदोबस्त
By Admin | Published: August 13, 2016 05:13 AM2016-08-13T05:13:30+5:302016-08-13T05:13:30+5:30
स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या शनिवार व रविवार या तीन दिवसांच्या सलग सुटीमुळे लोणावळ्यात पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन लोणावळा व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त
लोणावळा : स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या शनिवार व रविवार या तीन दिवसांच्या सलग सुटीमुळे लोणावळ्यात पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन लोणावळा व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने पर्यटकांच्या सोयीसाठी तीन दिवस सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतूक व्यवस्था तसेच कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी शनिवार ( दि. १३) ते बुधवार (दि. १७) दरम्यान तब्बल २० अधिकारी व २२५ पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून मंजूर करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा उपविभागीय अधिकारी विनायक ढाकणे आणि लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिली.
मागील आठवड्यात मुसळधार पावसामुळे शनिवार व रविवार लोणावळा व परिसरातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंद ठेवण्यात आली होती. सध्या शहरात पावसाचा जोर कमी झाला असल्याने सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली असणार असून, पर्यटकांनी मद्यपान करून हुल्लडबाजी व बेशिस्तपणा न करता लोणावळ्यातील पर्यटनाचा आनंद घ्यावा व कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासन व लोणावळेकर नागरिकांनी केले आहे.
तीन दिवस सलग सुटी व मागील आठवड्यात राज्यभरातील बहुतांश पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटकांची तोबा गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मध्य रेल्वेच्या वतीने शनिवार, रविवार व सोमवार या तीन दिवसांत सहा स्पेशल ट्रेन मुंबई-पुणेदरम्यान सोडण्याचा निर्णय घेतला आहे. द्रुतगती मार्गावरील व लोणावळा शहरातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी पर्यटकांनी जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. पर्यटनस्थळावरील धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवार ते सोमवार लोणावळ्यात सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, शहर व्यापाऱ्यांनीही हे तीन दिवस मालांचे अवजड ट्रक शहरात मागवू नयेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे लोणावळ्यामध्ये वाहतुककोंडी किंवा पर्यटकांना त्रास होणाऱ्या घटना घडणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
हुल्लडबाजांवर कडक कारवाई
लोणावळ्यात पर्यटकांचे लोणावळेकर नागरिक व पोलीस प्रशासनाकडून स्वागतच आहे. मात्र, पर्यटनाच्या नावाखाली सार्वजनिक शांततेचा भंग करणे, मद्यपान करून हुल्लडबाजी करणे, महिलांची छेडछाड, रस्त्यावर आरडाओरडा करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, असे प्रकार करणाऱ्या हुल्लडबाजांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे. याकरिता मोठ्या संख्येने ब्रिथ अॅनालायझर मशिन मागविण्यात आल्या असून, मुख्य चौक व चेक नाक्यावर ही तपासणी करण्यात येणार आहे.
भुशी धरणाकडील मार्ग होणार बंद
भुशी धरण व लायन्स पॉइंटकडे जाणारा मार्ग मुख्य चौकात दुपारी तीन वाजता बंद करण्यात येणार असून, सायंकाळी पाचनंतर धरण व डोंगरात उंच जाणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढण्यात येणार आहे. धरण परिसरात वाहने सोडण्याच्या वेळामध्ये पर्यटकांची संख्या व वाहतूककोंडीचे प्रमाण या प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेत बदल करण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले. शनिवार ते सोमवार लोणावळ्यात सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, कोणीही शहरात अवजड वाहने बस, मिनी बस, टेम्पो अथवा ट्रक आणू नयेत.