एकीकृत समिती काढणार वाहतुकीवर तोडगा : दीपक म्हैसेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 12:34 PM2019-06-22T12:34:49+5:302019-06-22T12:40:00+5:30
वाहतूक समस्या शहर आणि परिसरासाठी चिंतेचा विषय ठरत आहे
पुणे : शहर व परिसरातील सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी, वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची (पीयूएमटीए) स्थापना करण्यात आली आहे. वाहतुकीशी संबंधित सर्व यंत्रणांच्या समन्वयातून हे प्राधिकरण काम करेल असे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.
विधानभवन कार्यालयाच्या सभागृहात प्राधिकरणाची पहिली बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिचंवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, पुण महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, महाराष्ट्र मेट्रो रेलचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, प्राधिकरणाचे सचिव आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणकुमार देवरे यावेळी उपस्थित होते.
म्हैसेकर म्हणाले, वाहतुकीच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यात पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. वाहतूक समस्या शहर आणि परिसरासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करुन, त्यासंबंधीच्या दीर्घकालीन उपाययोजना आणखणे गरजेचे आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन निर्णय घेणे आवश्यक आहे. प्राधिकरणामधे काम करताना वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील घेण्यात येईल.
सौरव राव म्हणाले, महापालिकेची वाहतूक आणि हॉकर्स योजना लवकरच लागू होणार आहे. मात्र, कोणताही एक विभाग संपूर्ण वाहतूक व्यवस्थापन करु शकणार नाही. त्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. मेट्रो प्रकल्पाने बाधित असलेल्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिका प्रयत्न करेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. याशिवाय सायकलींचे शहर अशी ओळख शाहराला पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहू.
-------------------
बस पार्किंगवरही झाली चर्चा
महामेट्रा कॅरिडोर १ व २ पुणे मेट्रो लाईन ३ आणि एचसीएमटीआर तसेच रिंग रोडच्या कामाचा आढावा या वेळी घेण्यात आला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस पार्किंगची सुविधा आणि ई वाहनांच्या चार्जिंग स्टेशनच्या संख्येत वाढ करण्याबाबतही चर्चा झाली. प्राधिकरणातील अशासकीय सदस्यांनी या वेळी सादरीकरण केले.