सेवक आमदाराने मालक जनेतला जाब दिलाच पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:12 AM2021-01-03T04:12:14+5:302021-01-03T04:12:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “लोकप्रतिनिधी हा मालक नसून जनतेचा सेवक आहे. जनता मालक आहे. त्यामुळे सेवकाने आपल्या कामाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “लोकप्रतिनिधी हा मालक नसून जनतेचा सेवक आहे. जनता मालक आहे. त्यामुळे सेवकाने आपल्या कामाचा अहवाल जनतारुपी मालकासमोर मांडलाच पाहिजे,” असे मत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
शिवाजीनगर मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदारकीच्या एक वर्षाच्या कार्यकाळातील कामाच्या अहवालाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “आमचे नेतेच स्वतःला प्रधानसेवक म्हणतात, त्यामुळे आम्ही मालक होऊच शकत नाही. आम्हीही जनतेचे सेवकच आहोत.” चंद्रकांत पाटील म्हणाले, “कामाचा अहवाल देणे ही भाजपच्या रामभाऊ म्हाळगींनी घालून दिलेली आदर्श परंपरा आहे. यामुळे आपण काय केले आणि किती राहिले, हे आपल्याला व जनतेला पारदर्शकपणे समजते.” सिद्धार्थ शिरोळे यांनी प्रास्ताविकात वर्षभराचा लेखाजोखा, आलेले अनुभव, आपली भूमिका उपस्थितांसमोर विशद केली.