भीमा खो-यातील सात धरणात शून्य टक्के तर दहा धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 01:35 PM2019-05-27T13:35:22+5:302019-05-27T13:42:27+5:30
उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढल्याने धरणाची पाणी पातळी चांगलीच खालवत आहे....
पुणे: जिल्हा व परिसरातील नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या भीमा खो-यातील पंचवीसपैकी ७ धरणात शून्य टक्के तर १० धरणात दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे भीमा खो-यातील धरणे चांगलीच तळाला गेली आहेत. मात्र, पुणे शहर परिसराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणात ४१.७१ टक्के तर पानशेतमध्ये १८.४५ टक्के पाणीसाठा रविवारी उपलब्ध होता. त्यामुळे पुणे महापालिकेला सध्या पाण्याचा तुटवडा दिसून येत नसला तरी पाऊस लांबल्यास पुणेकरांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
राज्यातील बहुतांश सर्वच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून विदर्भ मराठवाड्यासह,मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होत आहे. तसेच उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढल्याने धरणाची पाणी पातळी चांगलीच खालवत आहे. काही भागात दुष्काळाची परिस्थिती भीषण झाली असून अनेक भागात नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.
भीमा खो-यातील पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड, टेमघर, नाझरे आणि उजनी धरणात शून्य टक्के पाणीसाठा असून माणिकडोह, येडगाव, विसापूर,चासकमान,भामा आसखेड,मुळशी, निरा- देवधर, भाटघर, वीर या दहा धरणात दहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर कळमोडी, पवना, कासरसाई ,पानशेत आणि गुंजवणी धरणात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे. त्यातच मान्सूनच्या महाराष्ट्रातील आगमनास वेळ लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला जात आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता चांगलीच जाणवणार आहे,असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
---------------------------
भीमा खो-यातील धरणांची पाणीसाठ्याची टक्केवारी
धरण टक्केवारी
पिंपळगाव जोगे ०.००
माणिकडोह १.२४
येडगाव ५.२०
वडज ०.००
डिंभे ०.००
घोड ०.००
विसापूर ३.७९
कळमोडी १८.०९
चासकमान ३.८५
भामा आसखेड ९.१२
वडीवळे ३६.०६
आंद्रा ४१.३७
पवना २१.५८
कासारसाई २०.८६
मुळशी ८.९४
टेमघर ०.००
वरसगाव ८.९२
पानशेत १८.४५
खडकवासला ४१.७१
गुंजवणी १३.८५
निरा देवधर २.६७
भाटघर ६.१६
वीर ०.५४
नाझरे ०.००
उजनी (उणे)-५१.३४